राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर आजपासून ‘फास्टॅग’ लागू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/fastag-new.png)
महाईन्यूज | मुंबई
देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर आजपासून (१५ डिसेंबर) फास्टॅग योजना लागू केली जाणार आहे. या योजनेमुळे टोलनाक्यांतून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व झटपट होईल. मात्र वाहनांवर फास्टॅग नसेल आणि तरीही फास्टॅगच्या मार्गिकेतून जाणाऱ्या वाहन चालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. सुरुवातीला टोल नाक्यांवरील ७५ टक्के मार्गिकांवरच ही योजना असेल, तर उर्वरित मार्गिकांवर टोल भरण्यासाठी रोख रक्कमेची सुविधा असणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केलेले आहे. याआधी १ डिसेंबरला योजना लागू केली जाणार होती.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या टोलनाक्यांवर वाहन चालकांना मोठय़ा रांगांना सामोरे जावे लागते आहे. सध्या टोलनाक्यांवर एका मार्गिकेतून जाताना फास्टॅगची योजना, तर उर्वरित मार्गिकेतून जाताना रोख रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांचा गर्दीच्या वेळेतील प्रवास अत्यंत धीमा होत होता. हे टाळण्यासाठी ‘वन नेशन वन फास्टॅग’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. टोलनाक्यांवरील सर्व मार्गिकांवर तर उर्वरित एकाच मार्गिकेवर रोख रक्कम भरण्याची सुविधा अंमलात आणली जाणार होती. मात्र १५ डिसेंबरपासून अंमलात येणाऱ्या योजनेत आता टोलनाक्यांवरील ७५ टक्के मार्गिकांवरच फास्टॅग असेल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.
- फास्टॅग मिळवण्यासाठी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व मालकाचा फोटो हवा
- एक लाख रुपयांपर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येणार असून बचत खात्याला लिंक करता येईल.
- डेबिट-क्रेडीट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा
- टोल नाक्यावरून जाताना वाहन चालकांना वाहनाचा वेग कमी ठेवावा लागेल.
- फास्टॅग नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांपर्यंतच काम करणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन टॅग घ्यावे लागेल व नोंदणी करावी लागणार आहे.