पालिकेच्या निष्काळजीपणामुळेच त्या चिमुकल्यांचा अंत – अरुण चाबुकस्वार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/ldfjj-1.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूसारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण आढळून येत असतानाच, थेरगाव येथील पडवळनगर परिसरात डेंग्यूमुळे दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार एका महिन्याच्या कालवधीत घडला आहे. या सर्व प्रकाराला महापालिकेचा आरोग्य विभागच जबाबदार आहे. वेळीच हालचाल केली असती तर, त्या चिमुकल्यांचा जीव वाचला असता, अशी हळहळ सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत चाबुकस्वार यांनी दिलेल्या प्रसिद्धीस पत्रकात म्हटले आहे की, उजेर हमीद मणियार (वय ४, रा. पडवळनगर, थेरगाव) या चिमुकल्याचा शुक्रवारी (दि १३) रोजी पहाटे मृत्यू झाला. त्याचाच भाऊ लहान भाऊ अदनान हमीद मणियार (वय 9) याचा १६ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. महिना उलटण्याच्या आतच एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तर, चिमुकल्याचे वडील हमीद मानियार यांच्या मोठ्या भावाची ३ वषार्ची मुलगी देखील तापाने फणफणत आहे. या परिसरात गेल्या आठ महिन्यांपूर्वी जुन्या पिण्याच्या पाण्याचे पाईप काढून नवीन टाकण्यात आले. मात्र, हे काम करताना जुने कनेक्शन आहे, त्या अवस्थेत ठेवण्यात आले असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिक वारंवार करत होते. मात्र, त्याकडे पालिकेने कानाडोळा केला, असेही चाबुकस्वार यांनी म्हटले आहे.
आजारांच्या प्रदुर्भावाकडे पालिकेचे दुर्लक्ष
पिंपरी-चिंचवड शहरात उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे तिन्ही नद्यांना पूर आला होता. पवना, इंद्रायणी, मुठा या नद्यांच्या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत तसेच नियोजन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसारख्या विविध साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. मनपा प्रशासनाने बघ्याची भूमिका घेत या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. महापालिकेचे पूर्णतः या आजारांच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याने आज हा प्रकार घडला आहे, असेही चाबुकस्वार यांनी म्हटले आहे.