कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी अरुण गवळीची याचिका हायकोर्टाने फेटाळली, जन्मठेप कायम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/arun-gavli-2.jpg)
मुंबई | महाईन्यूज| शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची मुंबईतील असल्फा भागात हत्या केल्याच्या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह इतर आरोपींना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (9 डिसेंबर) कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. 2 मार्च 2007 रोजी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची मुंबईतील असल्फा भागात हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला होता. पोलीस तपासाअंती मारेकऱ्यांनी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या सांगण्यावरुनच ही हत्या केल्याचं सांगितलं होतं.
अरुण गवळीने या हत्येसाठी यासाठी 30 लाख रुपयांची सुपारी दिली होती. याप्रकरणी हत्या, हत्येचा कट रचणे या आरोपांखाली मोक्का अंतर्गत साल 2008 मध्ये अरुण गवळीला अटक करण्यात आली होती. 2012 मध्ये मुंबईतील विशेष कोर्टाने अरुण गवळीला 14 लाख रुपयांचा दंड आकारत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर अन्य दहा आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेप रद्द करण्याची याचिका हायकोर्टाकडे दिली होती. मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळत त्यांची जन्मठेप कायम ठेवली आहे.