महिन्याभरात ‘इथे’ उभा राहणार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा?
![Shiv Sena chief Balasaheb Thackeray Yanchaya Jayantinimitta ophthalmologist Tapasani Shibir](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/BALASAHEB-THAKRE-FRAME.jpg)
महाईन्यूज | मुंबई
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नऊ फुटी उंच पुतळा दक्षिण मुंबईत उभारण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या चार वर्षांपासून मुंबई महापालिकेकडे प्रलंबित आहे. मात्र, आता शिवसेना राज्यात सत्तेत आल्यामुळे २३ जानेवारी २०२० पर्यंत बाळासाहेबांच्या जयंतीदिनापर्यंत हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
२३ जानेवारी हा बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे. त्यामुळे महिन्याभराने येणाऱ्या या दिवसापर्यंत हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण होऊ शकते. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या या वृत्तानुसार, ऑक्टोबर २०१५ मध्ये तत्कालीन मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी राजकीय गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर शहराच्या महापौर स्नेहल अंबेकर यांनी या प्रस्तावाची नोंद घेतली होती. त्यानंतर पालिकेने बाळासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी हिरवा कंदील दिला होता. पुढे याबाबतचा प्रस्ताव मुंबई वारसा संवर्धन समितीसमोर मंजुरीसाठी मांडण्यात आला होता.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटाची त्रिकोणी जागा या पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयाच्या समोरच ही जागा आहे. फोर्ट भागातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा ही जागा भाग आहे. दरम्यान, बीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या कामासाठी मुंबई नागरी कला आयोगाचीही संमती आवश्यक असणार आहे. या आयोगाकडून सार्वजनिक जागांमधील कलात्मक कामांचे निरिक्षण आणि देखभालीचे काम पाहिले जाते.