अमेरिकेचे कुटुंब-पुरस्कृत ‘ग्रीन कार्ड’ मिळवण्यासाठी २.२७ लाख भारतीय प्रतीक्षेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/gayoom-1.jpg)
वॉशिंग्टन : अमेरिकेचे कायम नागरिकत्व मिळवण्यासाठी आवश्यक असलेले कुटुंब- पुरस्कृत ‘ग्रीन कार्ड’ मिळवण्याकरिता अमेरिकेतील २ लाख २७ हजारांहून अधिक भारतीय प्रतीक्षेत असून, मेक्सिकोनंतर प्रतीक्षा यादीतील ही दुसऱ्या क्रमांकाची संख्या असल्याचे ताज्या आकडेवारीत म्हटले आहे.
कुटुंब- पुरस्कृत ग्रीन कार्डासाठी अमेरिकी काँग्रेसने वर्षांला कमाल १ लाख २६ हजार इतकी संख्या निश्चित केली असली, तरी सध्या सुमारे ४० लाख लोक हे कार्ड मिळण्याची वाट पाहात आहेत.
प्रतीक्षा यादीत सर्वाधिक, म्हणजे १५ लाख लोक अमेरिकेचा दक्षिणेकडील शेजारी असलेल्या मेक्सिकोतील आहेत. याखालोखाल इच्छुक भारतीयांची संख्या २ लाख २७ हजार, तर चीनची संख्या १ लाख ८० हजार इतकी आहे, असे अंतर्गत सुरक्षा विभागाने म्हटले आहे.
कुटुंब- पुरस्कृत ग्रीन कार्डाच्या प्रतीक्षा यादीपैकी बहुतांश हे अमेरिकी नागरिकांचे भाऊबंद आहेत. सध्याच्या कायद्यानुसार, अमेरिकी नागरिक हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि रक्ताच्या नातेवाईकांना ग्रीन कार्ड किंवा कायदेशीरदृष्टय़ा कायम नागरिकत्वासाठी पुरस्कृत करू शकतात.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र अशा कुठल्याही तरतुदीच्या विरोधात असून ते याचे वर्णन ‘साखळी स्थलांतर’ (चेन मायग्रेशन) असे करतात आणि ते रद्द करण्यास इच्छुक आहेत. याउलट, कुटुंब- पुरस्कृत स्थलांतर पद्धत रद्द करण्यास विरोधी डेमॉक्रॅटिक पक्षाचा जोरदार विरोध आहे.