अतिवृष्टी नुकसानीचा व्हाॅट्सअप द्वारे पंचनामा, तलाठ्यानं केली किमया
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/download-5.jpg)
धुळे – अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त पिकांचा व्हाॅट्सअपव्दारे पंचनामा करण्यात आला असून बळसाणे येथील तलाठ्याने ही किमया करून दाखवली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सरकारी यंत्रणेच्या कारभाराचा पंचनामाच केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर शुक्रवारी (ता. 15) जिल्हा दौ-यावर होत्या. त्यांनी देशभरातील जैन धर्मियांचे तिर्थक्षेत्र असलेल्या बळसाणे (ता. साक्री, जि. धुळे) येथे दुपारनंतर भेट दिली.
परतीच्या पावसासह अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी बळसाणेसह विविध गावातील पीडित शेतकरी व समस्याग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला.
बळसाणे येथे तलाठ्याने नुकसानग्रस्त शेतात जाऊन पिकांचा पंचनामा करण्याऐवजी चक्क व्हाॅटस्अपवर “पंचनामा ग्रुप, बळसाणे”, असा ग्रुप सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार चाकणकर यांच्या दौ-यात उजेडात आला. त्या ग्रुपमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानग्रस्त शेताचे व पिकाचे फोटो पोस्ट करायचे, अशी अनाकलनीय करामत तलाठ्याने केली. राज्यात असा अजबच प्रकार येथे पहायला मिळाल्याने चाकणकर खुपच संतापल्या.