शरदला रौप्य आणि मरियप्पनला कांस्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/l-14-1.jpg)
- जागतिक पॅरा-अॅथलेटिक्स स्पर्धा
शरद कुमार आणि मरियप्पन थांगाव्हेलू यांनी जागतिक पॅराअॅथलेटिक्स अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेतील उंच उडी प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक कमवत टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्रतेची दोन स्थाने निश्चित केली आहेत.
दोन वेळा आशियाई पॅराक्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या शरदने १.८३ मीटर उंच उडी घेतली, तर रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मरियप्पनने १.८३ मीटर उंच उडी घेतली. सॅम ग्रीवीने (१.८६ मीटर) विक्रमासह सुवर्णपदकावर नाव कोरले. शरदने सुरुवातीला आघाडी घेतली होती, परंतु सॅमने त्याला मागे टाकले.
‘‘माझी कामगिरी ही निराशाजनक आहे. गेली तीन वर्षे मी प्रशिक्षणासाठी युक्रेनला राहात आहे. त्यामुळे माझी स्वत:कडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. त्यामुळे आता माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मला पुनर्विचार करावा लागणार आहे,’’ अशी प्रतिक्रिया २७ वर्षीय शरदने व्यक्त केली.
‘‘सततच्या सरावानंतर आता विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे मित्रांसोबत लंडनला जाण्याची मी योजना आखत आहे,’’ असे शरदने सांगितले. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून ‘आंतरराष्ट्रीय नातेसंबंध’ या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण त्याने पूर्ण केले आहे. याच क्रीडा प्रकारात रामसिंग पढियाला (१.७७ मीटर) पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.