बंदिस्त जलवाहिनीचे काम पुर्ण करण्यास मावळचे खासदार अपयशी – सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार

खासदारांनी मागील पाच वर्षात काय केलं?, पाणी प्रश्नासाठी सर्वपक्षीय समिती नेमणार
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड शहराला पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यास आम्ही कटिबध्द आहोत. मात्र, मागील पंधरा वर्षाच्या काळात तत्कालीन सत्ताधा-यांनी पाणी पुरवठा योजनाचे प्रकल्प पुर्ण केलेले नाहीत. त्याशिवाय गेल्या पाच वर्षात मावळचे खासदार आणि शहराचे नागरिक म्हणून श्रीरंग बारणे यांनी पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम पुर्ण करण्यास कोणतेही प्रयत्न केेले नाहीत. त्यांनी पवना जलवाहिनीचे कामं करुन घेतली असती तर शहरवासियांना पाणी टंचाईची स्थिती उदभवली नसती, अशा शब्दात सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी खासदाराचा समाचार घेतला.
पिंपरी चिंचवड शहराला पाणी कपातीचे संकट आजही कायम आहे. त्यावरुन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अकार्यक्षम आयुक्त, टॅंकर लाॅबी आणि ठेकेदारी पोसण्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप केला. याविषयी सत्तारुढ पक्षनेते पवार म्हणाले की, पाणी प्रश्नासंर्दभात खासदार बारणेंना सर्वश्रुत माहिती आहे. आताच त्यांच्या विचारसरणीत एवढा बदल कसा काय झाला. मागील सत्ताधा-यांच्या काळात नव्याने पाण्याचे प्रकल्प झाले नाहीत. 24 बाय 7 योजनेचे अमृत योजनेची कामे आजही अपुर्ण अवस्थेत आहेत, पवना जलवाहिनी प्रकल्प ठेकेदारांने नकार दिल्याने गुंडाळण्यात आला. त्यामुळे शहराची वाढलेली लोकसंख्या आणि अतिरिक्त पाणी साठा घेवून पाणी टंचाई निर्माण होते, ही वस्तूस्थिती कायम आहे.
पाणी टंचाई सोडवण्यासाठी मावळचे खासदार आणि शहराचे नागरिक म्हणून श्रीरंग बारणे यांनी पवना जलवाहिनी प्रकल्प पुर्ण करण्यास कोणतेही प्रयत्न केलेले नाही. त्यांनी स्वताःच्या राजकीय पोळी भाजून घेण्याकरिता दुटप्पी भूमिका कायम ठेवली. त्यामुळे पवना जलवाहिनीचे काम पुर्ण करण्यास त्यांनी पुढाकार घेवून महापालिकेला मदत करावी, जेणेकरुन पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. असे त्यांनी म्हटले आहे.
खासदार बारणेंचा ठेकेदार आणि टॅंकर लाॅबीचा आरोप पक्षनेते पवार यांनी फेटाळला असून ते म्हणाले की, भाजप हा कोणत्याही चाैकशीला घाबरत नाही, खासदारांनी अशा चाैकशीची मागणी मागील दहा वर्षाच्या काळात करायला हव्या होत्या. ते त्यांनी केलेले नाही. असेही पवार म्हणाले.
दरम्यान, शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यास लवकरच स्वतंत्र पाणी समिती स्थापन करणार आहे. तसेच येत्या दोन वर्षात आंद्रा, भामा-आसखेड योजना प्रकल्पाची कामे पुर्ण करुन शंभर एमएलडी पाणी शहरवासियांना देवून पाणी समस्या कायमस्वरुपी सोडवण्यास प्रयत्न करणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.





