बसवंतवाडीतील महिला बचत गटाची महाराष्ट्राला ‘प्रेरणा’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/IMG-20191112-WA0009.jpg)
- राज्यातील पहिल्या शेळी दुध संकलन केंद्राचे उद्घाटन
- शेळीच्या दुधाला प्रती लिटर 80 प्रमाणे मिळतो भाव
तुळजापूर | महाईन्यूज | प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ सातत्याने पडत असतो, ग्रामीण भागात हाताला कामे उपलब्ध नसतात, कुटुंबाला जगवण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीला काम करावे लागते. आर्थिक अडचणीत असणाऱ्या कुटुंबाला सावरण्यासाठी गावातील महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक प्रयोग केले जातात. असाच एक प्रयोग तुळजापुर तालुक्यातील बसवंतवाडी गावच्या महिला बचत गटाच्या महिलांनी शेळी पालन करत महाराष्ट्रातील पहिली शेळीच्या दुधाची डेअरी सुरू करण्याचा उपक्रम चालविला आहे.
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळमुंडे यांच्या शुभहस्ते शेळीच्या दूध संकलन केंद्राचा शुभारंभ झाला. जिल्ह्याचा स्वतंत्र ब्रँड अशी ओळख असणारी उस्मानाबादी शेळी ही राज्यात नव्हे तर देशभर ओळखली जाते. हाच ब्रँड आता गावातील महिलांनी बाजारात आणण्यासाठी अनोखा प्रयोग सुरू केला आहे. शेळीच्या दुधाचे संकलन व उत्पादन विक्रीतून आर्थिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न तुळजापुर तालुक्यातील बसवंतवाडीच्या महिलांनी केल्याने तो महाराष्ट्रातील हा अनोखा उपक्रम ठरत आहे.
प्रेरणा महिला बचत गट बसवंतवाडी यांच्या वतीने बचत गटातील गुलचंदा केरबा दनाने, निर्मला नवनाथ गायकवाड, कोमल दादाराव शिंदे, सुष्मा नागनाथ बोबडे, ऐश्वर्या जगन्नाथ बोबडे, दीपाली सुनील शिंदे, अश्विनी राजेंद्र मुळूक आदींनी परिश्रम घेतले.
शेळीचे दूध आरोग्यासाठी चांगले आहे, रासायनिक कीटकनाशकांच्या माऱ्यामुळे बाजारात मिळणारे दूध आणि पालेभाज्या यामुळे माणसाचे आयुष्य आणि आरोग्य कमकुवत बनले आहे. शेळीच्या दुधाचा उपयोग झाल्यास गायीच्या दुधाप्रमाणे आरोग्याला फायदा होईल. तसेच, बसवंतवाडीसह इतर गावांनी हा प्रयोग करावा. महिलांनी कोंबडी पालन, शेळी पालन आणि दूध व्यवसाय याकडे नियोजनबध्द काम केल्यास आर्थिक सक्षमीकरण नक्की होता येईल, असाच प्रेरणादायी उपक्रम आहे.
उस्मानाबादी शेळी देशात प्रसिद्ध असून या शेळ्या वेगवेगळ्या 18 प्रकारचा राणचारा खातात. या भागातील वनस्पती तुरट आणि आंबट असणाऱ्या झुडपांचा पाला शेळ्यांच्या खाद्यामध्ये समाविष्ट असल्याने शेळीचे दूध आरोग्याला हितकारक आणि औषधी उपचाराप्रमाणे काम करते. आईच्या दुधाला समांतर दूध म्हणून गाईचे दूध मानले जाते. पुढील काळात गाईच्या दुधापेक्षा श्रेष्ठ दूध म्हणून शेळीचे दूध माणसाच्या वापरात येईल, अशा विश्वास बचत गटातील महिला सदस्यांनी व्यतिथ केला आहे.
अवघ्या 2 लिटर दुधापासून व्यवसायाला सुरुवात
तुळजापुर तालुक्यातील बसवंतवाडी गावात ५३० शेळ्या असून ४७ बोकडे आहेत. टाटा समाज विज्ञान संस्थेचे मार्गदर्शन घेतल्यामुळे या महिलांनी महाराष्ट्रातील पहिली शेळीच्या दुधाची डेअरी सुरू करण्याचे धाडस केले आहे. पहिल्या दिवशी दोन लिटर दूध संकलित झाले. या दुधाला रुपये तीस प्रमाणे दर मिळाला. हे संकलन पुढील दहा दिवसात 25 लिटर होणार आहे, अशी माहिती महिला सदस्यांनी दिली.
राजस्तानमधून सुचली दिव्य कल्पना
अभ्यास वर्गाच्या (इंटर्नशीप) नियोजनाद्वारे राजस्थान येथे गेलो असता हा प्रयोग पहावयास मिळाला. उस्मानाबाद जिल्ह्यात या व्यवसायाला मोठी संधी असल्याचे लक्षात येताच बसवंतवाडी गावात उपक्रम राबविण्याच्या कामाला सरुवात झाली. दोन महिन्यांपूर्वीपासून प्रोजेक्टचे काम करत असताना गावातील शेळीबाबत सर्व्हे करण्यात आला. सर्वसामान्य कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळी पालन अन तिच्या विक्रीतून होत असतो. पण नाविन्यपूर्ण कल्पना समोर आणत त्यांची मानसिकता तयार केल्याने त्यांना भविष्यातील फायदे लक्षात आले. त्याच्या भाषेत सांगायचे झाले तर सदस्यांच्या 8 बैठका घेण्यात आल्या. उस्मानाबाद येथील एसएसपी संस्थेच्या मदतीने बसवंतवाडी गाव निवडले गेलवे. अयमेरा शेळी दूध उत्पादक महिला संघ तुळजापुरात स्थापना केला. आगामी काळात अनेक गावांत हा प्रयोग यशस्वी करण्यात येणार आहे, अशी माहिती टाटा इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी प्रेमकूमार दनाने यांनी दिली.