राज्यात नक्कीच आश्चर्यकारक निकाल लागतील; शरद पवारांचा विश्वास
मुंबई – विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. यंदाच्या निवडणुकांचे निकाल आश्चर्यकारक असतील. लोकांचा प्रतिसाद पाहता हे घडू शकतं असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. एका मराठी माध्यमाशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, गेले काही वर्षात माझ्या पक्षात बऱ्याच घडामोडी घडल्या, सत्तेच्या काळात असणारे नेते सत्ता नसताना सोडून गेले, सत्तेशिवाय न राहण्याची स्थिती आल्यामुळे नेत्यांच्या मनात चलबिचल झाली. असे नेते सत्ताधारी पक्षात गेले. पक्षांतर केलेल्यांपैकी काही ५-१० नेते सोडले तर इतरांना संधी मिळाली नाही. या नेत्यांचा वापर करुन घेतला. एखादी व्यक्ती ४-५ आमदारांना निवडून आणणार असतील तर त्याला किंमत दिली जाते. नंतर हळूहळू त्यांना बाजूला सारुन दिलं जातं असं त्यांनी सांगितले.