पवईमध्ये तानसा मुख्य जलवाहिनीला तडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/tansa.jpg)
- युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू; मरोळ, चकाला, मालपा डोंगरी भागाला फटका
मुंबई : मुंबईकरांपर्यंत पाणी पोहोचविणाऱ्या तानसा मुख्य पूर्व जलवाहिनीला तडे पडल्याचे पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांना बुधवारी संध्याकाळी लक्षात आले. त्यानंतर त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तडे पडल्याने जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाहून गेले. पालिकेने युद्धपातळीवर हाती घेतलेले जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी पहाटेपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यामुळे मरोळ, चकाला, मालपा डोंगरी आणि आसपासच्या परिसरांतील रहिवाशांच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला.
मुख्य पूर्व तानसा जलवाहिनीला पवई येथे तडे पडल्याचे बुधवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास निदर्शनास आले. जल विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. त्यासाठी जलवाहिनी पूर्णपणे रिकामी करण्यात आली. दुरुस्तीचे काम गुरुवारी पहाटेपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.