गुजरातमध्ये ट्रक उलटून 19 ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/accident-1-3.jpg)
अहमदाबाद – गुजरातमधील भावनगर-अहमदाबाद महामार्गावर सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटल्याने 19 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. या भीषण अपघातात 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हा अपघात शनिवारी सकाळी भावनगर-अहमदाबाद महामार्गावरील बवाल्याली गावाजवळ घडला. सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक अचानक उलटला. या भीषण अपघातात ट्रकमधील 18 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर 7 जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने भावनगर येथील स्थानिक रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अन्य जणांची प्रकृती गंभीर आहे.
या दुर्घटनेतील सर्व शेतमजूर सरतानपूर (ता. तालाजा, जि. भावनगर) येथील ग्रामस्थ होते. या अपघातानंतर परिसरात एकच धावपळ उडाली. ट्रकमध्ये सिमेंटची पोती असल्याने त्याखाली दबल्याने मजूरांचा मृत्यू झाल्याचे समजते. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून तपासानंतरच ते स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.