छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकात भाजपचा घोटाळा, राष्ट्रवादी-काॅंग्रेसचा आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/1569331506.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात भाजपने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचाही हात असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यानंतर विरोधी पक्षांकडून फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे भ्रष्टाराचाराचे दाखले देण्यात येऊ लागले आहेत. सोमवारी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांचा दावा खोडताना तत्कालीन मंत्री प्रकाश मेहता आणि विद्यमान मंत्री सुभाष देशमुख यांच्या भ्रष्टाचाराचे उदाहरण दिले होते. त्यानंतर मंगळवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकामध्ये भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचे जलपूजन झाले होते. मात्र, आजही स्मारकाचे काम सुरू झाले नाही. याउलट शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप मलिक यांनी केला. यावेळी शिवस्मारकाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची कागदपत्रेच मलिक यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. हिंमत असेल तर आजच मुख्यमंत्र्यांनी या आरोपाचा खुलासा करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. दुसऱ्या टप्प्यात आणखी कागदपत्रे सादर करणार असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मेट्रो विभागातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.