पंतप्रधान मोदी झळकणार डिस्कव्हरी चॅनेलवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/2019-07-29.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन व्हेर्सेस वाइल्ड या कार्यक्रमामध्ये झळकणार आहेत. कार्यक्रमाचा सुत्रसंचालक बेअर ग्रिल्सनेच यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे.
बेअर ग्रिल्सने ट्विटवरुन एक टिझर पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, ‘जगभरातील १८० देशांच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची या आधी कधीही न पाहिलेली बाजू पहायला मिळेल. प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष्य वेधण्यासाठी मोदी भारतामधील जंगलांमधून फिरताना दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे मॅन व्हेर्सेस वाइल्ड नक्की पाहा डिस्कव्हरी इंडियावर ऑगस्ट १२ रोजी रात्री नऊ वाजता.’
People across 180 countries will get to see the unknown side of PM @narendramodi as he ventures into Indian wilderness to create awareness about animal conservation & environmental change. Catch Man Vs Wild with PM Modi @DiscoveryIN on August 12 @ 9 pm. #PMModionDiscovery
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांचा वापर करुन जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मॅन व्हेर्सेस वाइल्ड मधील त्यांचा सहभाग हा प्राणी संवर्धनाचा संदेश देण्यासाठीचा असाच एक प्रयत्न आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी बेअरचे स्वागत करताना दिसत आहेत. नंतर हे दोघे जंगलामधून, बोटीमधून प्रवास करतानाची दृष्ये या टीझरमध्ये आहेत. मोदींना थंडी वाजू नये म्हणून बेअर एका दृष्यात मोदींना कोट देतानाही दिसत आहे. हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने ‘फन राइड’ असेल असं या व्हिडिओत म्हटले आहे.
‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘मॅन व्हेर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमाचा चेहरा म्हणजे बेअर ग्रील्स हा जगभरामध्ये त्याच्या साहसासाठी प्रसिद्ध आहे. एखादा माणूस संकटात अडकला तर तो कसा वाचू शकेल याबद्दलचे प्रात्यक्षिके दाखवणारा बेअरचा चेहरा ‘डिस्कव्हरी’वरील ‘मॅन व्हेर्सेस वाइल्ड’मुळे घराघरात पोहचला आहे. जंगलामध्ये एकटेच अडकल्यावर आपण नैसर्गिक साधनांचा वापर करुन लोकवस्तीपर्यंत कशाप्रकारे पोहचू शकतो याबद्दल भाष्य करणारा ‘मॅन व्हेर्सेस वाइल्ड’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या खास पसंतीस पडला असून १८० हून अधिक देशांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होतो.