विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागांची तयारी; बावनकुळेंच्या वक्तव्याला चंद्रकांत पाटलांचा दुजोरा
शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येतील, हे आता ठरवण्याचे काही कारण नाही

पुणे : २०२४ विधानसभा निवडणुका दरम्यान भाजपा २४० जागा लढवेन आणि शिंदे गटाच्या वाट्याला ४८ जागा येतील असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. यानंतर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
भारतीय जनता पार्टी एक निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकीची तयारी करत असते. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागांची आम्ही तयारी करत आहोत. शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येतील, हे आता ठरवण्याचे काही कारणच नाही. त्यांनी आमची तयारी उपयोगी पडेल, असं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर व आय रूग्णालय, भोसरी गवळीमाथा आणि कासारवाडीतील कचरा हस्तांतरण केंद्राचे पाटील यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यावेळी उपस्थित होते.





