महानगरपालिका मानधन तत्वावर 77 शिक्षकांची करणार भरती
- प्राथमिक विभागातील हिंदी, इंग्रजी आणि उर्दु शाळांसाठी शिक्षकांची आवश्यकता
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या प्राथमिक विभागातील उर्दु माध्यमास 37 , हिंदी माध्यमास 21 आणि इंग्रजी माध्यमासाठी 19 अशा एकूण 77 शिक्षकांची मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहे. शिक्षकांना घड्याळी तासिका 85 रुपये प्रमाणे प्रतिमहा वेतन देण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षातील दहा महिन्यांसाठी शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत पहिली ते आठवीचे 121 विद्यालये, उर्दू माध्यमाची सहा विद्यालये कार्यरत आहेत. या विद्यालयांमधून सुमारे 40-45 हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. अनेक तुकडींच्या संख्येनुसार काही विषयांचे शिक्षक, सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती व रजा आदी कारणामुळे शिक्षकांची संख्या कमी झाली असून विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. यामुळे शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे.
प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या मागणीनुसार महापालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षक भरती करण्यात येत आहे. पिंपरी महापालिकेच्या माध्यमिक विभागामध्ये पुणे महापालिकेच्या अनुषंगाने दहा हजार रुपये मानधन देण्याकरिता घड्याळी तासिका दर 85 रुपये देण्यास समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी 77 शिक्षकांची मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहे. शिक्षकांना घड्याळी तासिका 85 रुपये तर मासिक साडेनऊ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक आठवड्याला सरासरी 28 तास होत असून महिन्याला साडेनऊ ते दहा हजार रुपये मानधन शिक्षकांना मिळू शकेल.
दरम्यान, संबंधित इच्छुक उमेदवाराने कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळा, पिंपरीगाव येथे 31 जूलै 2019 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत समक्ष उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले आहे.