हुकूमशाही थांबवा अन्यथा भाजप मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, काँग्रेस आक्रमक

- काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांचा इशारा
- प्रियांका गांधी यांच्या अटकेचा पिंपरीत काँग्रेसने केला निषेध
पिंपरी, (महाईन्यूज) – उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकारने बहुमतांच्या जोरावर सुरु केलेली दडपशाही, हुकूमशाही थांबवावी अन्यथा नागरिक त्यांच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाहीत. सोनभद्र येथील हत्याकांडात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुंटूंबियांना भेटण्यापासून प्रियांका गांधींना रोखणे म्हणजे लोकशाहीने दिलेल्या नागरी हक्कांची पायमल्ली आहे. पंतप्रधान मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चालवलेली हुकूमशाही व दडपशाही काँग्रेसचे कार्यकर्ते कदापी सहन करणार नाहीत, असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिला.
सोनभद्र येथील आदीवासी कुंटूंबातील दहा व्यक्तींची गोळ्या घालून निर्घुण हत्या करण्यात आली. त्यांच्या कुंटूंबियांना भेटण्यासाठी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी जात असताना नारायणपूर येथे उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. त्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शनिवारी (दि. 20) उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस सचिव बिंदू तिवारी, युवक प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस व प्रभारी प्रिया पवार, प्रदेश युवक सरचिटणीस मयूर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुध्दीन शेख, असंघटित कामगार कॉंग्रेस शहराध्यक्ष सुंदर कांबळे, ज्येष्ठ नागरिक सेल शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, दिलीप पांढरकर, विशाल कसबे, गौरव चौधरी, शितल कोतवाल, किशोर कळसकर, बाबा बनसोडे, परशुराम गुंजाळ, सज्जी वर्की, संदेश बोर्डे, वसिम शेख आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाही विरोधी व केंद्रातील भाजप सरकारच्या हुकूमशाही विरोधी घोषणा देत तीव्र निषेध नोंदविला.
साठे म्हणाले की, प्रियांका गांधी यांना केलेली अटक म्हणजे देशातील लोकशाही संपुष्टात येत असल्याचे संकेत आहेत. ज्याप्रमाणे इंग्रजांविरोधात लढून नागरिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याचप्रमाणे मोदी आणि योगी यांच्या जोखडातून भारतीय नागरिकांना मुक्त करण्यासाठी देशभर पुन्हा लढा उभारण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पदाची शपथ घेताना विरोधकांचा आदर करु असे सांगितले होते. प्रियांका गांधी यांना झालेली अटक म्हणजे मोदी बोलतात एक आणि करतात एक याचे ज्वलंत उदाहरण आहे. ज्या व्यक्तीला एका राज्यातून तडीपार करण्यात आले होते. तीच व्यक्ती देशाचे गृहमंत्री मंत्रीपदावर आरुड होते. त्यांच्या हातात देशाचे भवितव्य सुरक्षित नाही. नागरिकांच्या मूलभूत हक्क व स्वातंत्र्यावर हे सरकार गदा आणू पाहत आहे. त्या सरकारचा शहर कॉंग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत असल्याचेही सचिन साठे म्हणाले.





