इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड!
जकार्ता : भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा अडथळा पार करत इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यंदाच्या मोसमातील पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या सिंधूने या स्पर्धेत पहिल्यांदाच शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत सहज विजय मिळवला.
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने ४४ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात जपानच्या तिसऱ्या मानांकित ओकुहारावर २१-१४, २१-७ अशी आरामात मात केली. आता सिंधूला उपांत्य फेरीत चीनच्या दुसऱ्या मानांकित चेन यू फेई हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनेक पदकांना गवसणी घालणाऱ्या सिंधूने उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यावर सुरुवातीपासूनच आपली हुकूमत गाजवली. सिंधूला सुरुवातीला स्थिरावण्यासाठी थोडासा वेळ लागला, पण तिचे फटके जोरदार बसू लागल्यानंतर ६-६ अशा परिस्थितीतून तिने मागे वळून पाहिले नाही. एकापाठोपाठ गुणांची कमाई करत सिंधूने १०-६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर २१-१४ अशा फरकाने पहिला गेम जिंकून सिंधूने सामन्यात आघाडी घेतली.
दुसरा गेम सिंधूने अप्रतिम फटक्यांनी गाजवला. एकतर्फी झालेल्या या गेममध्ये सिंधूने आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या प्रतिस्पर्धीला सामन्यात पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. ओकुहाराच्या चुकांचा फायदा उठवत सिंधूने दुसऱ्या गेमसह सामन्यावर मोहोर उमटवली.