कचरा कुंडीकरण थांबवा, अन्यथा आयुक्तांच्या बंगल्यावर फेकणार कचरा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/201707071642412682_news-in-marathi-notice-to-Commissioner-about-RTI-center_SECVPF.jpg)
- शिवसेना संघटक सुलभा उबाळे यांचा इशारा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात कच-यांचा प्रश्न सोडवण्यास सत्ताधारी भाजप पदाधिका-यांना अपयश आले आहे. शहराची उत्तर-दक्षिण भागात वाटणी करुन दोन ठेकेदारांना कच-यांचा ठेका देताना मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसापासून कच-याचा ढिग मोठ्या प्रमाणात पडले आहेत. त्यामुळे कच-याचा प्रश्न सोडवा, अन्यथा आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या बंगल्यावर कचरा फेकून आंदोलन करणार आहे, असा इशारा शिवसेना संघटक सुलभा उबाळे यांनी दिला.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरातील कचरा समस्या लवकर सोडवावी, आयुक्त म्हणून आपण पदभार घेतल्यानंतर आमच्या शहराची वाट लागली आहे. शहर स्वच्छतेच्या बाबतीत पिछाडीवर गेले आहे. पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. नागरिकांच्या रोषाला अधिका-यांना सामोरे जावे लागत आहे. आपण कचरा प्रश्न तात्काळ न सोडविल्यास शिवसेना आपल्या बंगल्यावर कचरा फेको आंदोलन करुन निषेध करेल, असे म्हटले आहे.