मालाड दुर्घटना ; मुलीचा मृतदेह वर्सोवा समुद्रकिनारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/supreme-court-2.jpg)
मुंबई : मालाडच्या जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आंबेडकरनगरमधील २२ वर्षांच्या सोनाली सकपाळ हिचा मृतदेह सहा दिवसांनी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर सापडला आहे. घटना घडल्या ठिकाणापासून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर हा मृतदेह शनिवारी प्राप्त झाला असून सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा २८ वर पोहचला आहे.
मालाडची दुर्घटना १ जुलै रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडल्यानंतर पुढील तीन दिवस मृतदेह सापडत होते. मात्र आंबेडकरनगरमधील सोनाली सकपाळ (२२) हिचा मृतदेह सापडत नव्हता. अनेकदा शोध घेऊनही मृतदेह मिळत नसल्याने तिच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रारही कुरार पोलीस ठाण्यात नोंदविली होती. शनिवारी संध्याकाळी डीएननगरच्या खालच्या भागातील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर एका मुलीचा मृतदेह मिळाला होता. तिच्या हातावर ‘सोनाली‘ नावाचा टॅटू पाहून अशा मुलीचा शोध वर्सोवा पोलिसांनी शनिवारी केला. परंतु जवळपासच्या भागात काहीच पत्ता लागत नसल्याने त्यांनी बेपत्ताच्या यादीमध्ये शोध घेतल्यावर कुरारच्या घटनेतील सोनाली नावाची मुलगी बेपत्ता असल्याचे लक्षात आले. कुरार पोलिसांशी शनिवारी संपर्क केल्यानंतर रविवारी रात्री आठच्या सुमारास पोलीस ओळख पटविण्यासाठी दाखल झाले. मालाडच्या घटनेनंतर वाहून गेलेला हा मृतदेह मालाड क्रिक भागातून वर्सोवा बीच येथे गेल्याचा अंदाज कुरार पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह बराच काळ वाहत आल्याने चेहऱ्यावरून ओळख पटविणे शक्य नव्हते. तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या वर्णनानुसार तिच्या डाव्या हातावर तिच्या नावाचा टॅटू होता. हा टॅटू आणि तिचे कानातले यावरून मृतदेहाची ओळख पटविली गेली असल्याचे कुरार पोलिसांनी सांगितले.
सोनालीचे वडील सुनील सकपाळ पालिकेमध्ये कंत्राटी कामगार आहेत. या घटनेमध्ये तिचे आई-वडील, भाऊ आणि बहीण जखमी झाले आहेत. घरातले सर्व जण रुग्णालयात दिसत असताना आपली सोनालीच का दिसत नाही, यामुळे सुनील यांचा जीव कासावीस होत होता. रुग्णालयात भेटीस येणाऱ्या नगरातील तरुणांना ते सतत विचारत असायचे. त्यांची ही अवस्था पाहून नातेवाईकांनी सोनालीचा मृतदेह मिळाला असे ३ जुलैलाच सांगितले होते. परंतु मृतदेह दाखवा अशी विचारणा सुरू झाल्यावर मात्र त्यांनी सत्य परिस्थिती सुनील यांना सांगितली. अखेर मृतदेह सापडल्याने तिच्या वडिलांना रविवारी मृतदेहाची ओळख पटविण्यास घेऊन गेले.
सर्व आटोपून सोनालीसह सकपाळ कुटुंबीय झोपण्याची तयारी करत होते. त्याचवेळी घरात अचानक पाणी शिरल्याने त्यांची धावपळ सुरू झाली. पाण्याचा जोर खूप वाढल्याने सगळेच जण चहूबाजूला फेकले गेले. माझी लहान बहीण रुपाली हाताला लागल्याने तिला मी पटकन ओढले. तिला वर घेतो तोपर्यंत सोनाली वाहताना दिसली, तिच्या ड्रेसला पकडून ओढून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याच प्रवाह इतका जोरात होता की ड्रेस फाटून ती वाहत गेली. सुरुवातीला दोन दिवस मलाही वाटले की ती असले रुग्णालयातच. दिवस उलटले तरी ती दिसेना तेव्हा भीती वाटायला लागली, असे सोनालीचा भाऊ सचिनने सांगितले.