संरक्षक भिंतीच्या बांधकामावरून आरोप-प्रत्यारोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/mumbai-wallcollapse.jpg)
मुंबई : मालाडमध्ये ज्या संरक्षक भिंतीवरून २६ जणांना नाहक जीव गमवावा लागला त्या भिंतीच्या बांधकामावरून आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. नव्या संरक्षक भिंतीला पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच ठेवला नव्हता असा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. भिंतीपलीकडे साचणारे पाणी वाहून जाण्यासाठी जे मार्ग ठेवायला हवे होते ते खूपच लहान असल्याचे इथल्या रहिवाशांचे म्हणणे आहे. तर रहिवाशांनीच झोपडय़ा उभारण्यासाठी हे मार्ग बुजवल्यामुळे पाणी वाहून जाऊ शकले नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.
मालाडमधील पिंपरीपाडा येथे सोमवारी रात्री जलाशयाभोवती पालिकेने बांधलेली संरक्षक भिंत पडून मोठी दुर्घटना घडली. संरक्षक भिंत पडून होणाऱ्या दुर्घटना वाढलेल्या असताना पालिकेनेच बांधलेली भिंत पडल्यामुळेपालिकेवर टीका होऊ लागली आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी पालिकेने दगडी भिंत पाडून ही सिमेंट काँक्रीटची भिंत बांधली होती. ही भिंत चुकीच्या पद्धतीने बांधल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. डोंगर उतारावर बांधलेल्या या भिंतीचा पाया मजबूत नव्हता असे नागरिकांचे म्हणणे आहे. तर भिंतीतील पाणी जाण्याचे मार्ग बुजविल्यामुळे पलीकडे पाण्याची पातळी वाढत गेल्याचा पालिकेचा दावा आहे.
मातीमुळे मार्ग बुजले
जुन्या भिंतीमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी मोठमोठे मार्ग ठेवण्यात आले होते. तसेच ती भिंत दगडी असल्यामुळे झऱ्यांप्रमाणे पाणी त्यातून झिरपे, असे येथील रहिवाशी गणेश जाधव यांनी सांगितले.
नवीन भिंत सिमेंट काँक्रीटची असून तुकडय़ातुकडय़ांमध्ये बांधण्यात आली होती. त्यामुळे ती तितकी मजबूत नव्हती, असेही त्यांचे म्हणणे आहे.
पाण्याचे मार्ग बंद केले
काही झोपडीधारकांनी घरात पाणी येऊ नये म्हणून पाणी जाण्याचे मार्ग बुजवले, तर काहींनी झोपडय़ा उभारण्यासाठी बांबू घुसवून ही भोके बुजवली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भिंतीच्या पलीकडे पाण्याची पातळी वाढत भिंतीच्या उंचीएवढी झाली व भिंतीच्या वरून पाणी येऊ लागले. त्यामुळे भिंतीच्या खालची जमीन खचून ही भिंत पडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दोन जलाशयांभोवती नव्याने संरक्षक भिंत बांधणार
मालाड जलाशयाभोवती पालिकेने बांधलेली भिंत अडीच वर्षांत पडून झालेली दुर्घटना ताजी असतानाच पालिकेने मुंबईतील आणखी दोन जलाशयांभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. जुनी भिंत पाडून त्या जागी नवीन सिमेंट काँक्रीटची भिंत बांधण्यात येणार आहे. एफ उत्तर विभागातील रावळी येथील जलाशयाभोवती असलेली विटेची भिंत १९९८ मध्ये बांधण्यात आली होती. तसेच बोरिवली येथे टेकडी जलाशयाची दगडी भिंत १९९२ साली बांधण्यात आली होती. या दोन्ही भिंती पाडून त्या जागी नव्या भिंती बांधण्यात येणार आहेत.