नीरव मोदीची बहीण व मेहुण्याची सिंगापूरमधील खाती गोठवली
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याची बहीण व मेहुणे यांची सिंगापूर येथील बँक खाती गोठवण्याचा आदेश तेथील उच्च न्यायालयाने दिला आहे. त्या खात्यांमध्ये ४४.४१ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
सक्तवसुली संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार नीरव मोदीने त्याचा काळा पैसा नातेवाईकांच्या माध्यमातून परदेशातील खात्यात ठेवला. नीरव मोदी याची बहीण पूर्वी मोदी व मयांक मेहता यांच्या नावाने ब्रिटिश व्हर्जिन आयलंड येथे पॅव्हिलियन पॉइंट कार्पोरेशन ही कंपनी असून त्या कंपनीच्या नावाने सिंगापूरमध्ये पैसे ठेवण्यात आले आहेत. नीरव मोदी हा सध्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात लंडनमधील तुरुंगात आहे. सिंगापूर येथील उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाच्या सूचनेवरून नीरव मोदीची बहीण व मेहुणा यांची खाती गोठवण्याचा आदेश दिला असून त्यात ४४.४१ कोटी रुपये आहेत. या बँक खात्यातील पैसा हा नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातून मिळवलेला आहे असा दावा सक्तवसुली संचालनालयाने केला होता. काळा पैसा प्रतिबंधक कायद्यानुसार सिंगापूरने या खात्यावर गेल्या वर्षी टाच आणली होती. गेल्या आठवडय़ात नीरव मोदी व त्याच्या बहिणीची चार स्वीस बँक खाती गोठवण्यात आली असून त्यात २८३ कोटी रुपये आहेत. पंजाब नॅशनल बँकेला २ अब्ज डॉलर्सला गंडा घालण्याच्या प्रकरणात नीरव मोदी हा प्रमुख आरोपी आहे. तो, त्याची बहीण, मेहुणा, मामा यांची चौकशी सुरू आहे.