पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी बेडरूममध्ये छुपा कॅमेरा; संशयखोर पतीविरोधात गुन्हा
पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी पुण्यातील एका उच्चशिक्षित पतीने पत्नीच्या नकळत बेडरूममध्ये छुपा कॅमेरा लावला. ही बाब लक्षात येताच पत्नीने थेट पोलिसात धाव घेत पतीविरोधात तक्रार दिली आहे. संबंधित पतीविरोधात वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्याच्या हडपसर परिसरातील ही घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा पती विदेशात कामासाठी गेला होता. तेथून परत आल्यानंतर तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातूनच त्याने 22 ते 26 जानेवारीदरम्यान पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये छुपा कॅमेरा बसवला. फिर्यादी महिला घरात साफसफाई करत असताना तिला हा कॅमेरा दिसला. यामध्ये घरातील अनेक दृश्य चित्रित झाली होती. त्यानंतर संबंधित महिलेने पोलिसात धाव घेत पतीविरोधात तक्रार दिली.
या दाम्पत्याला बारा वर्षाचा मुलगा आहे. परदेशात काही काळ नोकरी केल्यानंतर आरोपी पती परत आला. त्यानंतर ते काही काळ एकत्र राहिले. परंतू त्यांच्यात वाद होऊ लागले. काही दिवसांनी आरोपी पती बंगळूरमध्ये राहण्यास गेला. शनिवारी-रविवारी तो मुलाला भेटण्यासाठी पुण्यात येत असे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे त्याने पत्नीच्या बेडरूममध्ये छुपा कॅमेरा बसवला. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.