राज्य सरकारची मोठी घोषणा! मराठवाड्यातील विविध योजनांसाठी ४५ हजार कोटींची तरतूद

मुंबई : राज्य सरकारने आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी मोठी घोषणा केली आहे. या सरकारने मराठवाड्यातील सिंचनावर कोट्यवधीची तरतूद केली आहे. मराठवाड्यातील विविध योजनांसाठी ४५ हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाड्यात पोटॅन्शिअल आहे. देशात झेप घेणारा हा मराठवाडा. वर्षभरात आमच्या महायुती सरकारने जे निर्णय घेतले पहिल्या कॅबिनेटपासून ते आजपर्यंत, त्यात सर्व सामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून घेतले. आतापर्यंत शेतीला पाणी पाहिजे, जमिनीला पाहिजे ही भावना ठेवून ३५ सिंचन प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे ८ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा – शाहरूख खानचा सलमानला टोला? म्हणाला, मला चित्रपट हिट करण्यासाठी ईदला प्रदर्शित…
आम्ही जे निर्णय घेतले ते मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातील लोकांना न्याय देण्यासाठी आहे. अंबड प्रवाही वळण योजना, निम्न दूधना प्रकल्प, सेलू परभणी कोटा उच्च पातळी बंधाऱ्यावर २३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, जोड परळी उच्च पातळी बंधारा. महंमदा पूर उच्च पातळी बंधारा, बाभळी मध्यम प्रकल्प धर्माबाद, वाकोद मध्यम प्रकल्प फुलंब्री यावर निर्णय घेतला आहे. त्यासाठी तरतूदी केल्या आहेत. सिंचन प्रकल्पावर एकूण १४ हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्यात येणार आहे. त्यावर १३ हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सिंचनावरील १४ हजार कोटी आणि गोदावरी खोऱ्यासाठीचे १३ हजार कोटी असे मिळून सिंचनावर एकूण २७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.