गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार
कासव आणि माशांच्या मृत्यूची चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी | निगडी येथील गणेश तलावात मोठ्या संख्येने कासव आणि मासे मृत अवस्थेत आढळल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी तलावाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून तलावातील जलचरांचे संरक्षण आणि तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी महानगरपालिकेचे सभागृहनेते प्रशांत शितोळे आणि नगरसदस्य शत्रुघ्न (बापू) काटे उपस्थित होते.
निगडी परिसरातील गणेश तलाव हा नागरिकांसाठी महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण असून, परिसरातील पर्यावरणीय समतोल आणि जैवविविधतेच्या दृष्टीनेही त्याचे विशेष महत्त्व आहे. मात्र, तलावात कासव आणि मासे मृत अवस्थेत आढळल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता, साचलेला गाळ आणि इतर संभाव्य कारणांची तांत्रिक तपासणी होणे आवश्यक असल्याचे उपमहापौर शर्मिला बाबर यांनी निवेदनात नमूद केले.

हेही वाचा
तलावातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून जलचरांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधावे, तलावातील साचलेला गाळ काढून स्वच्छता करावी तसेच तलावाच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी तलावाच्या पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी आणि आवश्यक देखभाल व्यवस्था निर्माण करण्यावरही त्यांनी भर दिला.
यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करत उपमहापौर शर्मिला बाबर यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याची विनंती केली. तलावाचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता या प्रश्नाकडे केवळ स्वच्छतेचा विषय म्हणून न पाहता जलचरांचे संरक्षण आणि नैसर्गिक जैवविविधतेचे संवर्धन या दृष्टीने पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण आणि जलचरांचे अस्तित्व टिकवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेश तलावा सह इतर गोष्टींचे मूळ नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय समृद्धी जपण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.
– शर्मिला बाबर, उपमहापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.




