Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

प्रतिजैविक औषधांचा गैरवापर रोखा; प्रत्येक फार्मसी रुग्णांसाठी विश्वासार्ह मार्गदर्शन केंद्र बनावे – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्सचा धोका रोखण्यासाठी फार्मासिस्टनी पुढाकार घ्यावा; छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : प्रतिजैविक औषधांचा अनावश्यक आणि अयोग्य वापर हे सार्वजनिक आरोग्यासमोरील गंभीर आव्हान आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधांचा वापर टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. औषधांचा योग्य आणि सुरक्षित वापर सुनिश्चित करण्यासाठी फार्मासिस्टनी सक्रिय भूमिका बजावावी. प्रत्येक फार्मसी हे रुग्णांना औषधांविषयी योग्य माहिती आणि मार्गदर्शन देणारे विश्वासार्ह केंद्र बनले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

भारतीय फार्मसी परिषद, एमजीएम विद्यापीठाचा औषधनिर्माणशास्त्र विभाग आणि वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिन आणि राष्ट्रीय फार्मसी सप्ताह २०२६ निमित्त एमजीएम रुग्णालयातील रुक्मिणी सभागृहात राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी भारतीय फार्मसी परिषदेचे अध्यक्ष डॉ. माँटू कुमार पटेल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, हिंदुस्थान अँटीबायोटिक्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. यशवंत घारपुरे आणि वॉकहार्ट रिसर्च सेंटरचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. सचिन भागवत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

प्रतिजैविक प्रतिकार ही संपूर्ण समाजासमोरील समस्या

केंद्रीय मंत्री जाधव म्हणाले की, प्रतिजैविक प्रतिकार अर्थात अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) ही समस्या केवळ एका रुग्णापुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित आहे. प्रतिजैविक औषधांचा अनावश्यक वापर, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे, स्वतःहून उपचारपद्धती बदलणे किंवा निर्धारित उपचार अपूर्ण ठेवणे यामुळे सूक्ष्मजीवांमध्ये औषधांविरोधात प्रतिकारक्षमता निर्माण होऊ शकते. परिणामी, सामान्य संसर्गांवर उपचार करणेही कठीण होण्याचा धोका असतो.

त्यामुळे प्रतिजैविक औषधांचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसारच करणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वतःहून औषधे घेणे किंवा उपचारांमध्ये बदल करणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

रुग्णांना योग्य औषध मार्गदर्शन देणे फार्मासिस्टची जबाबदारी

आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्ट हा रुग्ण आणि आरोग्यसेवा यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. औषधांची गुणवत्ता, योग्य मात्रा, वापरण्याची पद्धत, उपचाराचा कालावधी आणि संभाव्य दुष्परिणाम याबाबत रुग्णांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी फार्मासिस्टनी पार पाडावी, असे जाधव यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या सूचनेनुसार उपचार पूर्ण करणे, स्वतःहून औषधे बंद न करणे आणि उरलेली औषधे इतरांना न देणे याबाबतही नागरिकांमध्ये जनजागृती करावी. प्रतिजैविक प्रतिकाराच्या समस्येवर मात करण्यासाठी शासन, भारतीय फार्मसी परिषद, शैक्षणिक संस्था, औषधनिर्मिती उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्राने समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  विज्ञानाऐवजी स्मृतींचे प्राबल्य का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केलेला ब्राह्मणशाहीच्या वर्चस्वाचा मूलभूत प्रश्न!

आयुष उपचारपद्धतींच्या संशोधनाला प्राधान्य द्यावे

आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या आयुष उपचारपद्धती आरोग्य संवर्धन आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेत योगदान देत आहेत. पारंपरिक आरोग्यविषयक ज्ञानाचा आधुनिक विज्ञानाच्या आधारे अभ्यास करताना औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेच्या संशोधनाधारित मूल्यमापनाला प्राधान्य दिले पाहिजे, असे जाधव म्हणाले.

आधुनिक वैद्यक आणि आयुष उपचारपद्धतींमध्ये समन्वय साधताना वैज्ञानिक पुराव्यांना महत्त्व देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल आरोग्य आणि AI मुळे फार्मसी क्षेत्रात नव्या संधी

डिजिटल आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जैवतंत्रज्ञान आणि औषध संशोधनामुळे फार्मसी क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. या बदलांनुसार अभ्यासक्रम, प्रशिक्षण आणि संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे. भारतीय फार्मसी परिषद आणि शैक्षणिक संस्थांनी औषध सुरक्षा, रुग्ण मार्गदर्शन आणि प्रतिजैविक प्रतिकार प्रतिबंधावर अधिक भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, कौशल्य आणि संशोधनाचा उपयोग सामान्य नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी करावा. औषधांचा जबाबदारीने वापर ही केवळ नियमांची बाब नसून भावी पिढ्यांच्या आरोग्याशी संबंधित सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी मिळून ‘स्वस्थ भारत, समर्थ महाराष्ट्र’ घडविण्याचा संकल्प करावा, असेही जाधव म्हणाले.

फार्मसी शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रशिक्षणावर भर

भारतीय फार्मसी परिषदेचे अध्यक्ष डॉ. माँटू कुमार पटेल यांनी फार्मसी शिक्षणातील बदलांविषयी माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बी. फार्मा अभ्यासक्रमात क्लिनिकल फार्मसी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

फार्मसी शिक्षण आणि औषध उद्योग यांच्यातील समन्वय वाढविण्यासाठी इंडस्ट्री-अ‍ॅकॅडेमिया अ‍ॅडव्हायझरी बोर्ड स्थापन करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावे, औद्योगिक प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी परिषद प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

एम. फार्मा विद्यार्थ्यांच्या जीपॅट शिष्यवृत्तीसाठी २०० कोटी रुपये आणि संशोधन व कौशल्य केंद्रांसाठी ८० कोटी रुपयांच्या तरतुदीची माहितीही त्यांनी दिली. औषधांचा सुरक्षित वापर आणि प्रतिजैविक प्रतिकार रोखण्यासाठी फार्मासिस्टनी रुग्णांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती; फार्मसी परिषदेच्या वृत्तपत्रिकेचे अनावरण

कार्यक्रमाला भारतीय फार्मसी परिषदेचे सदस्य डॉ. श्रीकांत जोशी, प्रकाश वंजारी, डॉ. संजय तोष्णीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. एम. एच. देहगन, डॉ. हेमंत जैन आणि डॉ. स्वरूप लाहोटी यांच्यासह विविध फार्मसी संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी भारतीय फार्मसी परिषदेच्या वृत्तपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. डॉ. विलास सपकाळ आणि डॉ. संजय तोष्णीवाल यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिजैविक प्रतिकार प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group