TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुण्यात मनसेला मोठा धक्का; रणजित शिरोळेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राहुल गांधींच्या विचारांसोबत काम करण्याचा निर्धार

मनसेचे माजी राज्य सरचिटणीस आता काँग्रेसमध्ये सक्रिय; 'कुटुंबाचे काँग्रेसशी जुने संबंध, देशाच्या जडणघडणीत पक्षाचे मोठे योगदान' – शिरोळे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे माजी राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी मनसेची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. मनसेच्या स्थापनेपासून पक्षासोबत असलेले शिरोळे आता काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक काम करणार आहेत.

मनसेच्या स्थापनेपासून पक्षासोबत

रणजित शिरोळे हे पुण्यातील मनसेचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पक्षाचे काम केले आहे. मार्च २०२३ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती केली होती. मात्र, २०२४ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.

२००९ मध्ये मनसेने त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांना सुमारे ७५ हजार मते मिळाली होती. ते मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

शिरोळे कुटुंबाचे काँग्रेसशी जुने संबंध

रणजित शिरोळे यांचे वडील पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांचा काँग्रेसशी संबंध होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागे कौटुंबिक पार्श्वभूमीचाही संदर्भ असल्याचे शिरोळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ५ विकेट्सनी विजय; अर्शदीप-गुरनूरची भेदक गोलंदाजी

‘काँग्रेस हे काम करण्यासाठी निवडलेले माध्यम’

काँग्रेस प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना रणजित शिरोळे म्हणाले की, काँग्रेस पक्षाशी त्यांच्या कुटुंबाचे जुने संबंध आहेत. एक व्यक्ती म्हणून काम करण्यासाठी त्यांनी काँग्रेस हे माध्यम निवडले आहे. देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांनी सध्या देशात उभे केलेल्या राजकीय वादळाचा एक भाग होण्याचा आपला प्रयत्न असल्याचे शिरोळे यांनी सांगितले. आता पक्षाचे काम करून काँग्रेसला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

पुण्यातील राजकीय समीकरणांवर लक्ष

मनसेच्या स्थापनेपासून पक्षासोबत असलेल्या आणि राज्य सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळलेल्या रणजित शिरोळे यांचा काँग्रेस प्रवेश पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या प्रवेशाचा मनसेच्या स्थानिक संघटनेवर आणि काँग्रेसच्या आगामी राजकीय वाटचालीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group