नीता अंबानींचा मोठा निर्णय! कर्जतमध्ये १०० एकरांवर उभारणार ‘अनंत आश्रय’; ५ हजारांहून अधिक गरजूंना मिळणार निवारा
अनाथ मुले, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य निवासी टाऊनशिप; आरोग्यसेवा, शिक्षण, पुनर्वसन आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या सुविधाही मिळणार

मुंबई : रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या नीता अंबानी यांनी आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर केला आहे. मुंबईजवळील कर्जत येथे तब्बल १०० एकर क्षेत्रावर ‘नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय’ ही भव्य निवासी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून अनाथ मुले, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक अशा ५ हजारांहून अधिक गरजू व्यक्तींना आयुष्यभरासाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारला जात आहे. रविवारी त्यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ पार पडला. प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे.
५ हजारांहून अधिक रहिवाशांसाठी आयुष्यभराची व्यवस्था
‘अनंत आश्रय’मध्ये केवळ निवासाची सोय नसेल, तर रहिवाशांच्या दैनंदिन गरजा आणि दीर्घकालीन देखभालीचीही व्यवस्था केली जाणार आहे. निवासी सुविधांसोबत विशेष वैद्यकीय उपचार, पुनर्वसन, शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या प्रकल्पात रहिवाशांसोबतच त्यांची देखभाल करणारे कर्मचारी, डॉक्टर, आरोग्यसेवक आणि इतर सहाय्यक कर्मचारीही कार्यरत असतील. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पातून अंदाजे १५ हजार नागरिकांचा जीवनसमुदाय निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
दीर्घकालीन देखभालीची गरज असलेल्या व्यक्तींना सुरक्षित निवासस्थान, आरोग्यसेवा आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश असल्याचे नीता अंबानी यांनी सांगितले.
‘प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळावी’
या प्रकल्पाबाबत भावना व्यक्त करताना नीता अंबानी म्हणाल्या, “‘नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय’ ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मनाच्या कोपऱ्यातील एक नवी सुरुवात आहे. दिव्यांग व्यक्ती, घराची गरज असलेली मुले आणि प्रेम, काळजी व आधाराच्या शोधात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक प्रेमळ घर निर्माण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.”
माणुसकी, काळजी आणि वैद्यकीय मदतीच्या माध्यमातून कौटुंबिक जिव्हाळा जपणारा समुदाय निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निसर्गाच्या सान्निध्यात राहून काम करणे, शिकणे आणि सण-उत्सव साजरे करणे शक्य होईल, असे वातावरण येथे तयार केले जाणार आहे.
हेही वाचा – पुणे, साताऱ्यासह चार जिल्ह्यांत अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यापासून दिलासा, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
दिव्यांग मुलांच्या पालकांना मिळणार मनःशांती
नीता अंबानी यांनी पुढे सांगितले की, आयुष्यभर आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या आणि आपल्यानंतरही त्यांच्या भवितव्याची चिंता करणाऱ्या पालकांना या प्रकल्पामुळे मनःशांती मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे.
आपले मूल आयुष्यभर सुरक्षित घरात आणि कुटुंबासारख्या प्रेमळ वातावरणात राहील, याची खात्री पालकांना वाटावी, हा या प्रकल्पामागील भावनिक विचार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला सन्मानाने जगण्याची आणि प्रत्येक नव्या दिवसाकडे आशेने पाहण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
टाऊनशिपमध्ये भारतीय नद्यांच्या नावांवर आठ गावे
कर्जतमधील या प्रस्तावित टाऊनशिपमध्ये भारतीय नद्यांच्या नावांवर आधारित आठ निवासी गावांची निर्मिती केली जाणार आहे. प्रत्येक गावाची स्वतंत्र रंगसंगती, प्रतीके आणि संवेदनात्मक उद्याने असतील. यामुळे रहिवाशांना परिसर ओळखणे आणि तेथे सहज वावरणे सोपे होणार आहे.
प्रत्येक गावात कौटुंबिक वातावरण असलेली घरे उभारली जातील. रहिवाशांच्या देखभालीसाठी स्वतंत्र काळजीवाहक आणि पालकांच्या भूमिकेत काम करणारे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. प्रत्येक रहिवाशासाठी स्वतंत्र देखभाल आराखडा तयार केला जाईल. त्यात आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि वैयक्तिक कल्याणाचा समावेश असेल. या आराखड्याचा किमान दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जाणार आहे.
रुग्णालय, मंदिर, उद्याने आणि कार्यशाळाही असणार
‘अनंत आश्रय’च्या संपूर्ण परिसरात रहिवाशांच्या गरजा लक्षात घेऊन विविध सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये रुग्णालय, मंदिर, खेळाची मैदाने, उद्याने, शेती, कार्यशाळा आणि कॅफे यांचा समावेश असेल.
एकाच परिसरात निवास, आरोग्यसेवा, शिक्षण, पुनर्वसन आणि कौशल्य विकासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्यामुळे गरजू व्यक्तींना सुरक्षित आणि आधार देणारे वातावरण मिळावे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.




