देवगडच्या पर्यटनाला मिळणार चालना; खंदक उद्यानातून ५०० जणांना रोजगाराची संधी
देवगड किल्ल्यावरील खंदक उद्यान आणि एसटी बसस्थानक परिसरातील वाय जंक्शन सुशोभीकरणाचे भूमिपूजन; तीन महिन्यांत खंदक उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्याचा नितेश राणे यांचा मानस

सिंधुदुर्ग : देवगडच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासोबतच स्थानिक तरुणांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे उद्दिष्ट आहे. देवगडमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात असून, पर्यटनवाढीतून स्थानिक रोजगारनिर्मितीला मोठी संधी मिळेल, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
देवगड किल्ल्यावरील खंदक उद्यानाच्या विकासकामाचे तसेच देवगड शहरातील एसटी बसस्थानक परिसरातील वाय जंक्शन सुधारणा आणि सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष साक्षी प्रभू, पंचायत समिती सभापती गणेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, अधीक्षक अभियंता दिनेशकुमार बागुल, मुख्याधिकारी, उपविभागीय अभियंता शैलेश मोरस्कर, अविनाश पवार आदी उपस्थित होते.
खंदक उद्यानातून ५०० जणांना रोजगाराची संधी
देवगडच्या विकासासाठी प्रस्तावित असलेल्या मागण्या आता पूर्णत्वास नेल्या जात आहेत. या दोन्ही विकासकामांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच पर्यटन आणि रोजगारालाही चालना मिळेल. वाय जंक्शनच्या सुशोभीकरणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. खंदक उद्यान विकसित झाल्यानंतर सुमारे ५०० जणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तर अप्रत्यक्षपणे हजारो रोजगार निर्माण होण्यास मदत होईल, असे राणे म्हणाले.
येत्या काळात देवगडमध्ये ताज समूहाचा पर्यटन प्रकल्प सुरू झाल्यानंतर स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बोटनिर्मिती, जहाजबांधणी आणि पर्यटन प्रकल्पांवर भर
जिल्ह्यात उद्योग उभे राहावेत आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे राणे यांनी सांगितले. जिल्ह्यात बोटनिर्मितीचा आणखी एक प्रकल्प सुरू होणार आहे. गोवा शिपयार्डचा पुढील टप्पा रत्नागिरीत सुरू होत असून, त्यातून २५ हजार स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात पंचतारांकित हॉटेल्स, जहाजबांधणी आणि पर्यटन क्षेत्रातील प्रकल्प येत आहेत. स्थानिक तरुणांमध्ये मोठी क्षमता असून, त्यांना चांगला रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
हेही वाचा – प्रतिबंधित तंबाखू प्रकरणात ४ अधिकारी निलंबित; २१ जणांविरुद्ध विभागीय चौकशी
तीन महिन्यांत खंदक उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्याचा मानस
देवगडमधील खंदक उद्यानाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करून ते पर्यटकांसाठी खुले करण्याचा मानस पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. आनंदवाडी बंदर विकासाचे कामही पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कायाकिंग प्रकल्पाबाबत बोलताना या प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, नवीन योग्य जागा निश्चित झाल्यास तेथे नवीन जेट्टी उभारून कायाकिंग प्रकल्प स्थलांतरित करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऐतिहासिक वारशाचे जतन आणि पर्यटन सुविधांचा विकास
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता दिनेशकुमार बागुल यांनी केले. आर्किटेक्ट अमित कामत यांनी प्रस्तावित विकासकामांची माहिती दिली, तर इतिहास अभ्यासक डॉ. सुनील आठवले यांनी देवगड किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा उपस्थितांसमोर उलगडला. यावेळी देवगड व्यापारी संघ आणि चिरे खण संघाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.
दोन्ही विकासकामांसाठी १.८० कोटींची प्रशासकीय मान्यता
सिंधुरत्न समृद्ध योजना २.० अंतर्गत देवगड शहरातील एसटी बसस्थानक परिसरातील वाय जंक्शन सुधारणा आणि सुशोभीकरणासाठी ८०.७२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामातून वाहतूक व्यवस्था अधिक सुटसुटीत करण्यासोबतच परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत पर्यटनस्थळ विकासासाठी मूलभूत सुविधा या घटकातून देवगड किल्ल्यावरील खंदक उद्यानाच्या विकासासाठी एक कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या कामात दोन बुरुजांचे बांधकाम, २०० मीटर लांबीचा पादचारी मार्ग, जांभ्या आणि काळ्या दगडांचे बांधकाम, एम-२५ ग्रेड काँक्रिटीकरण तसेच ३०० मि.मी. व्यासाची आरसीसी पाइप बसविणे आदी कामांचा समावेश आहे. या सुविधांमुळे देवगडच्या ऐतिहासिक वारशाचे जतन होण्यासोबतच पर्यटन विकासालाही हातभार लागणार आहे.




