Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप? ओमर अब्दुल्ला यांच्या १९ आमदारांची गुप्त बैठक

Omar Abdullah | जम्मू-काश्मीरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलानंतर सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स (NC) पक्षातील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या तब्बल १९ आमदारांनी श्रीनगरमध्ये सलग ४ तास गुप्त बैठक घेतल्याने मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारवर गंभीर राजकीय संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या नाराज आमदारांमध्ये पक्षाच्या काही आमदारांसह काही अपक्ष आमदारांचाही समावेश असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील एका आमदाराच्या निवासस्थानी ही दीर्घ बैठक पार पडली. मंत्रिमंडळात डावलण्यात आल्याने संतप्त झालेल्या आमदारांनी थेट मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या जवळच्या सल्लागारांना तात्काळ पदावरून हटवण्याची आणि मंत्रिमंडळात नव्याने फेरबदल करण्याची आक्रमक मागणी लावून धरली आहे. पक्षाकडून आमदारांचे बंड रोखण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत; मात्र नाराज आमदारांची समजूत काढण्यात अद्याप यश आलेले नाही.

हेही वाचा

मनीषा भानवालाने रचला इतिहास! जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला

मध्यस्थांशी बोलण्यास नकार; थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चेचा हट्ट

या बंडखोरीची तीव्रता कमी करण्यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या एका निकटवर्तीयाला या आमदारांशी मध्यस्थी करण्यासाठी पाठवले होते. मात्र, आमदारांनी या मध्यस्थाशी चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला. “आम्हाला थेट मुख्यमंत्र्यांशीच बोलायचे आहे, त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याशी नाही,” अशी रोखठोक भूमिका या आमदारांनी घेतल्याचे समजते.

फारुख अब्दुल्लांचा प्रस्तावही फेटाळला

परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनी स्वतः पुढाकार घेत काही आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “दीड वर्षानंतर मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदल केले जातील आणि आता संधी न मिळालेल्यांना तेव्हा सामावून घेतले जाईल,” असा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. मात्र, बंडखोर आमदारांनी हा प्रस्तावही फेटाळून लावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या बंडखोरीला कसे सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button