Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘तिसरी मुंबई महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन ठरेल’; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

नैना प्रकल्पातील अडचणी दूर केल्याचा दावा; ‘शेतकऱ्यांना जमिनीचे कागद दिल्यानंतरच भूमिपूजन’, भूमिपुत्रांना विकासातील संधींमध्ये प्राधान्य देण्याचे आश्वासन

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ आणि नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) प्रकल्पामुळे या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र, विकासाचे योग्य नियोजन झाले नाही, तर परिसराचा विकास बकाल आणि अस्ताव्यस्त पद्धतीने होण्याची भीती असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे नियोजनबद्ध विकासासाठी नैना प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची ग्वाही

नैना प्रकल्पातील अडचणींबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पाला यापूर्वी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली होती. मात्र, प्रत्यक्ष कामाला गती का मिळत नाही, याचा आढावा घेतल्यानंतर काही अडचणी समोर आल्या. गेल्या दोन वर्षांत निर्माण झालेल्या अडचणी आपण आणि एकनाथ शिंदे यांनी एका बैठकीत सोडवल्याचा दावा त्यांनी केला.

प्रकल्पात शेतकऱ्यांना ४० टक्के जमीन देण्याची तरतूद असली, तरी ही जमीन नेमकी कुठे मिळणार, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सिडकोला अंतिम आराखड्यात आवश्यक दुरुस्त्या करून तो पुन्हा सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘येत्या २ ते ३ महिन्यांत राजकारणात मोठ्या घडामोडी’; मंत्री गणेश नाईक यांचे सूचक विधान

‘जमिनीचे कागद दिल्यानंतरच भूमिपूजन’

शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे कागदपत्रे दिल्यानंतरच प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी भूमिका सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या परिसरातील दोन्ही आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. नैना प्रकल्पाची माहिती सर्वसामान्यांना समजावी, यासाठी सिडकोने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचेही त्यांनी अभिनंदन केले.

भूमिपुत्रांना विकासातील संधींमध्ये प्राधान्य

विकासातून निर्माण होणाऱ्या संधींवर पहिला अधिकार भूमिपुत्रांचा असला पाहिजे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडले. विमानतळ, पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध शहरी विकासामुळे या भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक संधी निर्माण होतील. त्याचा लाभ स्थानिक नागरिकांना मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि पालघर या भागांमध्ये विकासाच्या मोठ्या संधी असून, हे क्षेत्र महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला गती देतील, असेही ते म्हणाले.

नवी मुंबई विमानतळासाठी सिग्नलमुक्त प्रवासाचे नियोजन

नवी मुंबई विमानतळापर्यंत मुंबईहून प्रवास करताना वरळीपासून अटल सेतूपर्यंत सिग्नलमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समन्वय साधून या परिसरातील नागरिकांपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवण्याचेही नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले.

नैना प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून या परिसराचा नियोजनबद्ध विकास साधण्यावर सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानातून स्पष्ट झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group