“कदाचित उद्याच हल्ला करू!”; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला मोठा इशारा, चर्चेचे दरवाजेही ठेवले खुले

Donald Trump | अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले आहे. “अमेरिका इराणवर कदाचित उद्याच हल्ला करू शकते,” असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांमधील शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. त्यानंतर आता थेट लष्करी कारवाईचे संकेत दिल्याने मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले आहेत. मात्र, हा आक्रमक इशारा देतानाच त्यांनी मुत्सद्देगिरी आणि राजनैतिक कराराचे दरवाजेही पूर्णपणे बंद केलेले नाहीत.
फ्लोरिडा येथे पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी आणि इराणच्या संघर्षावर भाष्य केले. इराणवर पुन्हा हल्ला करण्याच्या शक्यतेवर पत्रकारांनी विचारणा केली असता ट्रम्प म्हणाले, “मी तुम्हाला नक्की काय करणार हे सांगेन असे तुम्हाला वाटते का? पण अशी शक्यता आहे की आम्ही कदाचित उद्याच हल्ला करू. त्याच वेळी अशीही शक्यता आहे की अमेरिका आणि इराणमध्ये एक उत्तम करार होईल. इराणला स्वतःला हा करार करायचा आहे आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यास ते उत्सुक आहेत. पण मुख्य प्रश्न असा आहे की, ते या कराराच्या अटींचे काटेकोर पालन करतील का?”
हेही वाचा
‘कडक कपडे घालून इम्प्रेशन मारतात, पण ओनरशिप नसते’; नितीन गडकरींचा राजकीय नेत्यांना टोला
#WATCH | When asked about the possibility of attacking Iran again, US President Donald Trump says, “…There’s a possibility I will (attack Iran).There’s also a possibility we’ll have a nice, big, beautiful agreement. But the problem is will they hold the deal?…”
(Source: US Network Pool Via Reuters)
— ANI (@ANI) October 24, 2026
अमेरिकेच्या लष्करी कारवाईचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकन नौदल आणि लष्कराने अत्यंत प्रभावी आणि उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आमच्या सैन्याने इराणची सर्व लढाऊ विमाने नष्ट केली आहेत, तर त्यांची २५९ जहाजे समुद्राच्या तळाशी गेली आहेत. आता इराणकडे शिल्लक काहीही राहिलेले नाही, त्यांच्याकडे केवळ भीषण महागाई उरली आहे.”
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक व्यापाराला फटका
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षाचा सर्वाधिक फटका जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीला बसत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठी अडचण निर्माण झाली असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम होत आहेत. हा तणाव कमी करण्यासाठी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नसताना, ट्रम्प यांच्या ताज्या इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता आणखी वाढली आहे.




