मतदार यादीत ‘चंद्र यादव’, ‘बी.कॉम’ अशी नावे! रोहित पवारांचा ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल
उत्तर प्रदेशातील पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीतील कथित घोळावरून वाद; ‘एवढा गलथान कारभार ज्ञानेश कुमार यांनाच शोभतो’, म्हणत निवडणूक आयोगाला सवाल

मुंबई : उत्तर प्रदेशातील मतदार यादीमध्ये विचित्र आणि चुकीची नावे नोंदवली गेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. इलाहाबाद-झाशी पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीतील कथित त्रुटींवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. ‘एवढा गलथान कारभार ज्ञानेश कुमार यांनाच शोभतो,’ अशा शब्दांत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना लक्ष्य केले आहे.
मतदार यादीत विचित्र नावे; रोहित पवारांचा सवाल
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत उत्तर प्रदेशातील मतदार यादीतील काही नोंदींकडे लक्ष वेधले. त्यांच्या पोस्टनुसार, काही मतदारांची नावे आणि त्यांच्या वडिलांच्या नावांच्या नोंदींमध्ये गंभीर चुका आढळल्या आहेत. यामध्ये ‘राम ने यादव को मारा’, ‘मूर्ख चंद्र यादव’, ‘बी.कॉम’ आणि ‘टक्कर मारना’ यांसारख्या नोंदींचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकारावरून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रोहित पवार यांनी मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटींवर टीका केली. तसेच, विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील कथित घोळाबाबत विरोधकांनी यापूर्वी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना या घटनांमुळे पुष्टी मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा – विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
‘निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे’
‘हा गलथान कारभार नाही का?’ असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला. निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून त्यांनी भाजपलाही लक्ष्य केले. आयोगाच्या कामकाजाचे समर्थन करणाऱ्या भाजपने या प्रकरणावर उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणामुळे मतदार यादीतील नोंदींची अचूकता, ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया आणि निवडणूक व्यवस्थेतील तांत्रिक त्रुटी यांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
नेमके प्रकरण काय?
उत्तर प्रदेशातील इलाहाबाद-झाशी पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत काही नोंदी चुकीच्या पद्धतीने झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मतदाराचे नाव किंवा वडिलांचे नाव असलेल्या रकान्यात असंबद्ध शब्द आणि नावे नमूद झाल्याचे सांगितले जात आहे.
या त्रुटींविषयी विचारणा झाल्यानंतर सॉफ्टवेअरमधील अडचणींमुळे चुका झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विधान परिषद निवडणुकीसाठी प्रथमच ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया राबवण्यात आल्याने या चुका झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मतदार यादीतील नोंदींमधील त्रुटींचे नेमके स्वरूप, त्यांची संख्या आणि त्या दुरुस्त करण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार, याकडे लक्ष लागले आहे. या मुद्द्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हेही पाहावे लागणार आहे.




