‘Gen-Z कडे माहिती भरपूर, पण ज्ञानाचा अभाव’; विद्यार्थ्यांच्या माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याची जबाबदारी शिक्षकांवर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मातृभाषेतील शिक्षणामुळे मुलांच्या मानसिक विकासाला चालना; मोबाईल आणि सोशल मीडियाला नाकारण्याऐवजी योग्य वापर शिकवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

नागपूर : आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात Gen-Z आणि Gen-Alpha पिढीकडे माहितीचा मोठा साठा आहे. मात्र, या माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याची गरज असून, ही महत्त्वाची जबाबदारी शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर येथे आयोजित नवव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
मातृभाषेतील शिक्षण मुलांच्या विकासासाठी महत्त्वाचे
विकसित देशांमधील शैक्षणिक अभ्यासक्रम मातृभाषेत असण्यावर भर दिला जातो, तर अनेक विकसनशील देशांमध्ये पूर्वी राज्य करणाऱ्या देशांच्या भाषांचा शिक्षणात वापर होतो, असे निरीक्षण मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोंदवले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
लहान मुलांच्या आयुष्यातील पहिली पाच वर्षे मानसिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात मुलांशी मातृभाषेत होणारा संवाद त्यांच्या मानसिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे शिक्षणाच्या प्रक्रियेत मातृभाषेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मोबाईल आणि सोशल मीडियाचा योग्य वापर महत्त्वाचा
आजचा विद्यार्थी मोबाईलमध्ये अधिक वेळ घालवतो, अशी चर्चा केली जाते. मात्र, मोठ्यांचाही मोबाईलचा वापर वाढला असून, आपली एकाग्रता टिकवण्याचा कालावधीही काही सेकंदांपर्यंत मर्यादित होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मोबाईल आणि सोशल मीडियाला पूर्णपणे नाकारण्याऐवजी त्यांचा योग्य आणि परिणामकारक वापर कसा करायचा, यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी कसा करता येईल, याचा विचार शिक्षकांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पाच वर्षांत तांत्रिक दरी कमी होण्याची अपेक्षा
शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेबाबत असलेली दरी आता कमी होत आहे. आगामी पाच वर्षांत ही दरी आणखी कमी होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत (AI) बोलताना त्यांनी मानवी संवेदना आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. AI कडे मानवी संवेदना आणि नैतिकतेची जाणीव नसते; मात्र, हीच मूल्ये आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत, असे ते म्हणाले.
शिक्षणव्यवस्थेत मानवी मूल्यांना प्राधान्य
तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणे पुरेसे नसून, त्या माहितीचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच मानवी संवेदना, नैतिकता आणि विचार करण्याची क्षमता विकसित करण्यावर भर द्यावा, असा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
दरम्यान, यावेळी नितीश भारद्वाज यांनी राज्य सरकारकडे काही अपेक्षा व्यक्त केल्या असून, त्याबाबत निश्चितच विचार केला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.




