Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

१० रुपयांच्या फाटलेल्या नोटेवरून वाद आणि मारहाण; डिलिव्हरी बॉयने विष पिऊन संपवले जीवन

नवी दिल्ली | अवघ्या १० रुपयांच्या फाटलेल्या नोटेवरून झालेल्या किरकोळ वादानंतर ग्राहकाने दिलेली धमकी आणि शेजाऱ्याने केलेली कथित मारहाण यामुळे एका २३ वर्षीय डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना पूर्व दिल्लीत घडली आहे. स्वाभिमानाला ठेच पोहोचल्यामुळे विषारी औषध प्राशन केलेल्या समीर हुसेन या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा २४ वा वाढदिवस होता. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित ग्राहक आणि त्याच्या शेजाऱ्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू केली आहे.

ही धक्कादायक घटना पूर्व दिल्लीतील विनोद नगर परिसरात घडली. ‘फ्लिपकार्ट मिनिट्स’साठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा समीर हुसेन हा कॉफीची ऑर्डर पोहोचवण्यासाठी ६५ वर्षीय रामपाल सिंह यांच्या घरी गेला होता. ऑर्डरचे बिल भरताना रामपाल सिंह यांनी त्याला १० रुपयांची फाटलेली नोट दिली. समीरने सदर नोट बदलून देण्याची विनंती केली असता, दोघांमध्ये वाद सुरू झाला. ग्राहकाने उद्धटपणे “पैसे घ्यायचे असतील तर घे, नाहीतर निघून जा,” असे सुनावले तसेच राजकीय ओळखींचा धाक दाखवत मारहाणीची धमकी दिली, असा आरोप समीरने केला होता.

हेही वाचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

वाद सुरू असतानाच रामपाल यांचा शेजारी राकेश ऊर्फ बंटी (वय ३०) तेथे पोहोचला. त्याने समीरला जाब विचारत तीन ते चार वेळा जोरात कानशिलात लगावली. तसेच त्याच्या मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थितीवर आणि कामावर अत्यंत हीन दर्जाची टिप्पणी करून त्याला अपमानित केले. या घटनेनंतर समीरने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली; मात्र आपल्याला न्याय मिळेल की नाही याबाबत त्याला तीव्र शंका वाटत होती.

व्हिडिओ रेकॉर्ड करून विष प्राशन; मन हेलावणारा आक्रोश

समीरने संपूर्ण घटनेचे काही व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. एका व्हिडिओमध्ये तो हातात विषाची बाटली घेऊन बोलताना दिसतो. “पुढील २४ तासांत मला न्याय मिळाला नाही, तर मी हे औषध पिऊन घेईन. माझा स्वाभिमान पूर्णपणे चिरडला गेला आहे,” असे तो म्हणतो. आपल्या आईला उद्देशून बोलताना समीरने अश्रू अनावर करत म्हटले, “आई, तुझा मुलगा मनाने खूप खंबीर आहे, पण हा समाज त्याला जगू देणार नाही.” त्यानंतर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्याने हे विषारी द्रव्य प्राशन केले. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत रामपाल सिंह आणि राकेश ऊर्फ बंटी या दोघांनाही अटक केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button