TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

दुष्काळावर दसरा मेळाव्यात बोलणार पंकजा मुंडे; ‘माझ्या लोकांसाठी पाऊस पाड बाबा’, भगवान बाबांना घालणार साकडं

सावरगाव घाटातील भगवान भक्ती गडावर २० ऑक्टोबरला मेळावा; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावरही प्रतिक्रिया, ‘मुख्यमंत्री कुणालाही सोडणार नाहीत’

बीड : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पावसाच्या प्रतीक्षेमुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे दुष्काळाच्या प्रश्नावर भाष्य करणार आहेत. ‘माझ्या लोकांसाठी पाऊस पाड बाबा’, अशी प्रार्थना भगवान बाबांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. २० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दसरा मेळावा माझ्यासाठी भावनिक विषय : पंकजा मुंडे

सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावरील दसरा मेळावा हा आपल्यासाठी भावनिक विषय असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. मंचावर उभे राहून भाषण होईपर्यंत मनात धाकधूक असते, असेही त्या म्हणाल्या.

हा मेळावा लोकांचा असून, भक्ती आणि प्रेमापोटी नागरिक येथे येतात. भगवान बाबांना त्यांच्या जन्मगावी आणण्याचे भाग्य आपल्याला लाभले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या मेळाव्याला कोणताही राजकीय अजेंडा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मागील मेळाव्यात व्यसनमुक्ती आणि स्त्रीभ्रूणहत्येसारख्या सामाजिक विषयांवर भाष्य केले होते. यंदा मात्र दुष्काळी परिस्थिती, पावसाची प्रतीक्षा आणि ग्रामीण भागातील समस्यांवर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा पहिल्यांदाच नवरात्रीचे व्रत ठेवल्याचे नमूद करत, आपल्या लोकांसाठी पाऊस पडावा, अशी प्रार्थना भगवान बाबांकडे करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा –  राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून भाजपचा संजय राऊतांना पलटवार; नवनाथ बन, बावनकुळेंची ठाकरे गटावर टीका

‘मुंबई सुरक्षित आहे, मुख्यमंत्री कुणालाही सोडणार नाहीत’

अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या घटनेवरही पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. देश आणि राज्य विकासाच्या मार्गावर असताना काही वाईट प्रवृत्ती डोके वर काढतात. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

मुंबई सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने मुंडे साहेबांनी मोठे काम केले असून, ते नाकारता येणार नाही, असे सांगत त्यांनी मुंबईच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला. एखाद-दुसरी घटना घडली तरी गृहमंत्री खंबीर आहेत आणि मुख्यमंत्री कोणालाही सोडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवरात्रीत कन्यापूजन करण्याचा आनंद

नवरात्रीच्या काळात शक्तीची पूजा आणि उपासना केली जाते. यंदा कन्यापूजन करण्याचे भाग्य लाभल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. आपल्या दोघींनाही मुलं आहेत, मात्र मुलगी नसल्याने कन्यापूजनातून ती हौस पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे दुष्काळ, पावसाची प्रतीक्षा आणि ग्रामीण भागातील परिस्थितीबाबत काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button