दिव्यांगांच्या स्वावलंबनाला नवी दिशा! राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत ‘मिट्टी कॅफे’चे उद्घाटन
‘दिव्यांगांना संधी आणि सन्मान दिल्यास ते समाजाच्या विकासात मोलाचे योगदान देऊ शकतात’; देशभरातील ८० ठिकाणी सामाजिक समावेशकतेचा उपक्रम

मुंबई : दिव्यांग व्यक्तींच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि सन्मान दिल्यास त्या स्वावलंबी होऊन समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. व्यावसायिक उपक्रमांमध्ये सामाजिक बांधिलकी, करुणा आणि सेवाभाव यांची सांगड घातल्यास सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवता येते. दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्या कौशल्याला आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ देणारा ‘मिट्टी कॅफे’ हा सामाजिक समावेशकतेचा प्रेरणादायी उपक्रम आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
मुंबईतील ओबेरॉय स्कायसिटी मॉल येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘मिट्टी कॅफे’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार अतुल भातखळकर, उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी आमदार सुभाष पासी, ज्येष्ठ पत्रकार कुमार राकेश, मिट्टी कॅफेच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अलिना आलम, स्कायसिटी मॉलचे प्रतिनिधी आणि ‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी उपस्थित होते. कॅफेमध्ये कार्यरत दिव्यांग सदस्यांचे पालकही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
‘दिव्यांगांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक’
राज्यपालांनी मिट्टी कॅफेच्या उपक्रमाचे कौतुक करताना व्यक्तीचे कार्य, प्रयत्न आणि कामाप्रती असलेले समर्पण यातून तिच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते, असे सांगितले. प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते. अनेकदा व्यक्तीची कृती आणि कामातील प्रामाणिकपणा हेच तिच्या विचारांचे प्रभावी माध्यम ठरतात. मिट्टी कॅफेमध्ये कार्यरत दिव्यांग व्यक्ती आपल्या कामातून हे सिद्ध करत आहेत, असे ते म्हणाले.
दिव्यांग व्यक्तींच्या काम करण्याच्या पद्धतीपेक्षा त्यांच्यातील क्षमता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण यांना महत्त्व दिले पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी अधोरेखित केले.
व्यावसायिक उपक्रम राबवताना केवळ आर्थिक लाभाचा विचार न करता समाजातील विविध घटकांच्या गरजा आणि क्षमता लक्षात घ्याव्यात. व्यावसायिक संस्थांनी सामाजिक संवेदनशीलता जपत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
छोट्या टेबलापासून देशभरातील ८० ठिकाणांपर्यंत प्रवास
मिट्टी कॅफेच्या संस्थापक अलिना आलम यांनी या उपक्रमाच्या प्रवासाची माहिती दिली. दिव्यांग व्यक्तींना आर्थिक स्वावलंबन आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, या उद्देशाने २०१७ मध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. एका छोट्या टेबल आणि छत्रीपासून सुरू झालेला हा प्रवास आज देशभरातील सुमारे ८० ठिकाणांपर्यंत पोहोचला आहे.
मिट्टी कॅफेमध्ये शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक दिव्यांगत्व असलेल्या प्रौढ व्यक्तींना हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करण्याची संधी दिली जाते. सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती भवन, मुंबई, बंगळुरू आणि लखनऊ विमानतळांसह विविध सार्वजनिक ठिकाणी तसेच कॉर्पोरेट कार्यालयांच्या परिसरात या कॅफेचे कामकाज सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
दोन कोटींहून अधिक कॉफीचे कप; गरजूंना ८० लाखांहून अधिक जेवणाची ताटे
अलिना आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिट्टी कॅफेच्या माध्यमातून आतापर्यंत ग्राहकांना दोन कोटींहून अधिक कॉफीचे कप देण्यात आले आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ८० लाखांहून अधिक जेवणाची ताटे वितरित करण्यात आली आहेत.
योग्य संधी आणि पाठबळ मिळाल्यास दिव्यांग व्यक्ती स्वतः स्वावलंबी होण्यासोबतच समाजातील इतर गरजू घटकांनाही मदत करू शकतात, असे आलम यांनी सांगितले. दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेविषयी जनजागृती करणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि समाजात सर्वसमावेशकतेची भावना रुजविणे ही मिट्टी कॅफेची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिव्यांग सदस्यांनी दिली सेवाभावाची प्रचिती
कार्यक्रमादरम्यान मिट्टी कॅफेमध्ये कार्यरत दिव्यांग सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. दोन सदस्यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. बौद्धिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींनी तयार केलेला केक राज्यपालांनी कापला. त्यानंतर त्यांनी कॅफेमध्ये पहिली ऑर्डर दिली. व्हीलचेअरवरील कॅशियर आणि दिव्यांग प्रौढ सदस्यांच्या चमूने ही ऑर्डर सर्व्ह केली.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.




