‘दुष्काळाला संकट नव्हे, संधी समजा!’; तुकाराम मुंढेंचा शेतकऱ्यांना सल्ला, दुग्ध व्यवसायातून आर्थिक स्थैर्याचा मार्ग
‘दरवर्षी टँकर आणि ट्यूबवेल मागतो, पण हिशेब ठेवतो का?’; पिंपरी-चिंचवडमधील ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पोमध्ये मुंढेंचे परखड सवाल

पिंपरी-चिंचवड : दुष्काळाकडे केवळ संकट म्हणून न पाहता त्यातून नव्या संधी शोधल्या पाहिजेत. पावसावर अवलंबून राहण्याऐवजी दुग्ध व्यवसायासारख्या पूरक व्यवसायांना प्राधान्य देऊन आर्थिक स्थैर्याचा मार्ग शोधावा, असा सल्ला आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी शेतकऱ्यांना दिला. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो’मध्ये ते बोलत होते. दुष्काळाची कारणे समजून घेण्याबरोबरच पुढील सहा ते सात महिन्यांत उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करून काय करता येईल, याचे नियोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शासनाचे काम मदत करणे आहे आणि शासन ते करत राहील. मात्र, प्रत्येक वेळी मदतीवर अवलंबून न राहता सध्याच्या परिस्थितीकडे ‘प्रॉब्लेम स्टेटमेंट’ म्हणून पाहिले पाहिजे. दुष्काळ येतो, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करणे गरजेचे आहे, असे मुंढे यांनी सांगितले.
दुग्ध व्यवसायात संधी; शुद्ध दुधाला मागणी
अन्न व औषध प्रशासनाच्या कामात दुधाचाही समावेश असल्याचे सांगत मुंढे म्हणाले की, देशात दुधाची गरज असून दुग्ध व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी आहे. दुधाला मिळणारा दर आणखी वाढू शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी जनावरे आणि पाण्याची व्यवस्था करावी लागते; मात्र, नियोजनातून या क्षेत्रात संधी निर्माण होऊ शकतात. कमी पाण्यातही योग्य पद्धतीने दुग्ध व्यवसाय करता येऊ शकतो. शुद्ध दुधाला मागणी असून दुग्धजन्य पदार्थांवर आधारित उद्योगही उभारता येतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुग्ध व्यवसायातील गैरप्रकार रोखण्यासाठी आपण नियामक म्हणून काम करत असल्याचे सांगत या क्षेत्रात शेतकरी, उद्योजक आणि संबंधित घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचेही मुंढे यांनी नमूद केले.
हेही वाचा – अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवे समीकरण? राम शिंदे-नीलेश लंके यांची बंद दाराआड चर्चा
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’वर भर द्या
दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामीण भागात पाणी अडवणे आणि जमिनीत पाणी जिरवण्याच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मुंढे यांनी सांगितले. केवळ टँकर किंवा ट्यूबवेलची मागणी करण्यापेक्षा पाण्याचा दीर्घकालीन प्रश्न कसा सोडवता येईल, याचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.
‘आपण दरवर्षी टँकर मागतो, ट्यूबवेल मागतो; पण या प्रश्नाचा कधी सखोल विचार केला आहे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एखाद्या गावासाठी किती ट्यूबवेल तयार करण्यात आल्या, त्यांचा किती उपयोग झाला आणि त्याबाबत नोंदी ठेवल्या जातात का, याचा हिशेब तपासण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
संकटातून स्वावलंबनाचा मार्ग शोधा
दुष्काळाची कारणे आणि त्यावरील उपायांचा सखोल अभ्यास करून भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर तात्पुरत्या उपायांबरोबरच कायमस्वरूपी उपाय शोधले पाहिजेत. संकटामुळे खचून न जाता पूरक व्यवसाय, पाण्याचे नियोजन आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर यांवर भर दिल्यास ग्रामीण भागात आर्थिक संधी निर्माण होऊ शकतात, असा संदेश तुकाराम मुंढे यांनी शेतकऱ्यांना दिला.




