पडळकरांची जिल्हा बँक निवडणुकीत पुन्हा एन्ट्री! चंद्रकांत पाटलांनी चॉकलेट देत दिला ‘कानमंत्र’
‘बोलणे कमी, काम जास्त करा’; गोपीचंद पडळकरांचे अभिनंदन करत चंद्रकांत पाटलांची मिश्कील टिप्पणी, सांगली डीसीसी बँकेच्या निवडणुकीत रंगत वाढली

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांची निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा एन्ट्री झाली आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांचे अभिनंदन करत त्यांना चॉकलेट दिले. यावेळी मिश्कील टिप्पणी करत ‘बोलणे कमी आणि काम जास्त करून दाखवा,’ असा सल्ला त्यांनी पडळकरांना दिला.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत सोसायटी गटातून पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर तो बाद करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानेही हा निर्णय कायम ठेवल्याने पडळकरांच्या निवडणुकीतील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांच्या उमेदवारी अर्जाला दिलासा मिळाल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
‘उन्माद नको, उत्साह हवा’
पडळकरांचा सत्कार करताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या स्वभावाचा आणि राजकीय ताकदीचा उल्लेख करत मिश्कील टिप्पणी केली. पडळकर बँकेत आल्यावर काय होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. कसलेल्या पैलवानाप्रमाणे पडळकर आठ-दहा जणांना लोळवू शकतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
मात्र, त्याचवेळी पडळकरांनी केवळ बोलण्यापेक्षा कामावर अधिक भर द्यावा, असा सल्ला पाटील यांनी दिला. ‘उन्माद नको, उत्साह हवा,’ असे सांगत त्यांनी पडळकरांना संयम राखण्याची सूचनाही केली.
हेही वाचा – ‘न्यायासाठी निर्भय व्हा, संविधानाशी तडजोड नको!’; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा तरुण वकिलांना मोलाचा संदेश
पडळकरांच्या उमेदवारीवर काय होते आक्षेप?
गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांच्या कुणीकोणूर सर्वसेवा सहकारी सोसायटीतील सभासदत्वाबरोबरच निंबवडे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील संचालकपदाच्या अनुभवाबाबत आक्षेप घेण्यात आले होते.
जिल्हा बँकेच्या उपविधीनुसार संबंधित संस्थेचे किमान दोन वर्षांचे सभासदत्व आणि व्यवस्थापन समितीवर एक वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक असल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला होता. पडळकर यांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजी कुणीकोणूर येथे जमीन खरेदी केली असल्यास त्यापूर्वी त्यांना संस्थेचे सभासदत्व कसे मिळाले, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला होता. तसेच निंबवडे पतसंस्थेचे कार्यक्षेत्र केवळ गावापुरते मर्यादित असल्याने तेथील सभासदत्व आणि संचालकपद निवडणुकीच्या पात्रतेसाठी ग्राह्य धरता येते का, यावरही आक्षेप घेण्यात आला होता.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या दिलाशामुळे पडळकर पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.




