सीजेपी नेते सौरव दास, आशुतोष रांका तिहार तुरुंगात; उद्या दिल्लीत ‘सीजेपी’ची भव्य ‘तिरंगा सभा’

नवी दिल्ली | जंतर-मंतर परिसरात बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टी (‘सीजेपी’) चे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना बुधवारी औपचारिकरीत्या अटक केली आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांनी दोघांनाही पाच दिवसांच्या कोठडीसाठी तिहार तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईनंतर राजधानीतील राजकीय वातावरण तापले असून ‘इंडिया’ आघाडीसह प्रमुख विरोधी पक्षांनी सीजेपीला उघड पाठिंबा दर्शवला आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ही ‘अघोषित आणीबाणी’ असल्याचे सांगत येत्या शुक्रवारी दिल्लीतील कनॉट प्लेस येथे ‘तिरंगा सभे’चे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे.
एसआयआर (SIR) विरोधी आंदोलनांचे केंद्र राहिलेल्या जंतर-मंतरवरील आंदोलनांवर पोलिसांनी नुकतीच बंदी घातली आहे. तरीही मंगळवारी सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड ओलांडून जंतर-मंतरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आशुतोष रांका, सौरव दास, अजिंक्य शिंदे यांच्यासह ११ जणांना ताब्यात घेतले होते. यातील रांका आणि दास यांनी आधीच्या बंधपत्रातील शर्तींचा भंग केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक अटक केली. दुसरीकडे, अजिंक्य शिंदे यांच्याकडून शांतता राखण्याची हमी घेऊन जामिनावर सुटका करण्यात आली.
दिपकेंचे ‘तिरंगा सभे’चे आवाहन
या अटकेची तुलना थेट ब्रिटिश काळाशी करत अभिजीत दिपके म्हणाले, “ब्रिटिश राजवटीत तिरंगा फडकवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अटक केली जात होती, मोदी सरकारही आज तेच करत आहे. राष्ट्रध्वज फडकवणे हाच देशातील सर्वात मोठा गुन्हा ठरवला जात आहे. देशात आणीबाणीच आणायची असेल तर ती अधिकृतपणे जाहीर करा.” शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता कनॉट प्लेस येथे नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन सभेसाठी एकत्र यावे, तसेच दिल्लीत येणे शक्य नसलेल्यांनी आपापल्या गावांत एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा
ससून डॉकमधील मच्छीमारांना परवडणाऱ्या दरात गोदामे; जागा हस्तांतरणासाठी अनुदानाचा पर्याय
राहुल गांधींचा भाजपवर निशाणा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध करत सीजेपीच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा केली. “जंतर-मंतरवर तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही. त्यासाठी तरुणांना तुरुंगात टाकणे हे सरकारच्या भ्याडपणाचे लक्षण आहे. जंतर-मंतर हे जनतेचे आहे आणि ते आम्ही पुन्हा मिळवणारच,” असा निर्धार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
यावर भाजपचे राष्ट्रीय माध्यम संयोजक आशिष उषा अगरवाल यांनी प्रत्युत्तर दिले. “संविधान निदर्शने करण्याचा अधिकार देते, कायदा हातात घेण्याचा नाही. राहुल गांधी बेकायदेशीर कृतींचे समर्थन करून देशाची दिशाभूल करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
आंदोलन चिघळले
दरम्यान, जंतर-मंतरवरील निर्बंध आणि सीजेपी नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ एनएसयूआय (NSUI), युवक काँग्रेस व इतर विद्यार्थी संघटनांनी पटेल चौकात जोरदार निदर्शने करत शक्तिप्रदर्शन केले. १० ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.




