राज्यातील सर्व १.०८ लाख शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षणाचा विस्तार; २.१० कोटी विद्यार्थ्यांसाठी नियोजन
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश; ‘राष्ट्र प्रथम’ संकल्पनेवर भर, शिक्षकांना सात दिवसांचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या पुरस्कार गुणांत वाढ करण्यासाठी प्रस्ताव

मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या सुमारे १ लाख ८ हजार शाळांमधील २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत स्काऊट-गाईड प्रशिक्षण पोहोचविण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये या उपक्रमाचा विस्तार करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
शालेय शिक्षण मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईड उपक्रम राबविण्याबाबत बैठक झाली. सध्या राज्यातील सुमारे ३० हजार शाळांमधील १७ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाची व्याप्ती वाढवून सर्व माध्यमांच्या शाळांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
‘राष्ट्र प्रथम’ संकल्पनेवर भर
‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून शालेय शिक्षण विभाग काम करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित करण्यासाठी सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईड उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत परेड, संचलन आणि देशभक्तिपर गीतांवरील कवायत बंधनकारक करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत स्काऊट-गाईडसाठी आठवड्यातून दोन तासिका घेण्यात याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी राज्य सरकारची हालचाल; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक
शिक्षकांना सात दिवसांचे प्रशिक्षण
स्काऊट-गाईड उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शाळांमधील शिक्षकांना तालुकास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शुल्क आणि प्रशिक्षकांचे मानधन शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येईल, अशी माहिती मंत्री भुसे यांनी दिली.
प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण नियमितपणे देता येईल आणि या उपक्रमाचा विस्तार अधिक व्यापक स्वरूपात करता येईल, असा या नियोजनामागील उद्देश आहे.
पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणांत वाढ करण्याचा प्रस्ताव
स्काऊट-गाईडमधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पुरस्कारांशी संबंधित गुणांमध्ये वाढ करण्याचा विचारही करण्यात येत आहे. सध्या राज्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना तीन गुण, तर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक मंगेश जोशी, उपसचिव तुषार महाजन, स्काऊट-गाईडचे सहायक राज्य सचिव रमेश जाधव यांच्यासह शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह आणि संचालक मंगेश जोशी हे ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभागी झाले.




