एस. जयशंकर यांनी सूत्रसंचालकाला मध्येच थांबवलं; जपानचा उल्लेख करताच सभागृहात पिकला हशा!
‘जपानचा उल्लेख करावा लागेल, नाहीतर घरी अडचण होईल’; पत्नीचा संदर्भ देत परराष्ट्रमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी, व्हिडीओची चर्चा

नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. अमेरिका-चीन स्पर्धा, भारत-अमेरिका संबंध, जागतिक व्यापार आणि बदलते परराष्ट्र धोरण अशा विविध मुद्द्यांवर ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडत असतात. मात्र, यावेळी त्यांच्या एका मिश्किल टिप्पणीमुळे ते चर्चेत आले आहेत.
‘ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम’मधील एका चर्चेदरम्यान परराष्ट्र धोरणावर संवाद सुरू असताना सूत्रसंचालकाकडून जपानचा उल्लेख राहून गेला. यावर जयशंकर यांनी स्मितहास्य करत सूत्रसंचालकाला मध्येच थांबवले आणि हलक्याफुलक्या शैलीत ही चूक निदर्शनास आणून दिली.
नेमकं काय घडलं?
चर्चेदरम्यान सूत्रसंचालकाने भारताच्या परराष्ट्र धोरणाचा संदर्भ देताना अमेरिका, चीन, युरोप आणि रशिया यांचा उल्लेख केला. मात्र, भारताचा महत्त्वाचा भागीदार असलेल्या जपानचा उल्लेख राहून गेला. ही बाब लक्षात येताच जयशंकर यांनी सूत्रसंचालकाला थांबवत जपानचा उल्लेख करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
जयशंकर यांनी मिश्किलपणे म्हटले की, “तुम्ही पाचवा देश जपान विसरलात. मला हा मुद्दा मांडावा लागला. अन्यथा मी तुमची ही चूक सुधारली नाही, तर मला घरी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हे रेकॉर्डवर येणं गरजेचं आहे.”
या टिप्पणीमधून त्यांनी आपल्या पत्नीचा संदर्भ दिला. जयशंकर यांच्या पत्नी जपानी असल्याने त्यांनी हा उल्लेख विनोदी शैलीत केल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा – २२ ऑक्टोबरपासून साखर कामगारांचा बेमुदत संपाचा इशारा!
टिप्पणीने सभागृहात हशा
जयशंकर यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेच्या वातावरणात हलकेफुलके क्षण निर्माण झाले आणि सभागृहात हशा पिकला. परराष्ट्र धोरणासारख्या गंभीर विषयावरील चर्चेत त्यांनी केलेल्या या मिश्किल टिप्पणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असल्याचे वृत्त आहे.
या प्रसंगामुळे जयशंकर यांच्या परराष्ट्र धोरणावरील ठाम भूमिकेसोबतच त्यांची विनोदी शैलीही चर्चेत आली आहे.




