TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

आडाचीवाडी ग्रामपंचायतीचा राज्यात डंका! महाराष्ट्रातील सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पहिला पुरस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव; ‘मुख्यमंत्री पंचायतराज अभियान’ सुरू, पुरस्कारप्राप्त गावांना स्वतः भेट देणार

पुणे : ग्रामविकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यातील सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार पटकावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचाही गौरव करण्यात आला. यामध्ये नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गाव-खेड्यांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचा’ शुभारंभ केला. स्थानिक स्वराज्य संस्थांनी विकासकामांमध्ये पुढाकार घ्यावा आणि गावांच्या प्रगतीसाठी लोकसहभाग वाढवावा, यावर त्यांनी भर दिला.

पुरस्कारप्राप्त गावांना स्वतः भेट देणार

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले. जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान गावकऱ्यांची ताकद आणि लोकसहभागाचा प्रभाव अनुभवला असल्याचे त्यांनी सांगितले.

समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंचांचे आणि गावांचे अभिनंदन करताना, ज्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले आहेत, त्या गावांना स्वतः भेट देऊन तेथील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी व्यासपीठ आणि प्रेक्षकांमधील अंतरावरही त्यांनी भाष्य केले. जनतेला भेटण्यासाठी अनावश्यक अडथळे निर्माण करू नयेत, अशी सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला केली.

हेही वाचा –  ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP आक्रमक; कार्यकर्त्यांच्या सुटकेनंतर केंद्र सरकारवर गंभीर आरोप

संकटात शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा

राज्यातील पावसाची तूट आणि खरीप पिकांच्या नुकसानीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने कार्यवाही सुरू केली असून, प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे ते म्हणाले.

धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य वापर करावा, धरणांतील गाळ काढण्याची कामे हाती घ्यावीत आणि पावसाचा प्रत्येक थेंब जपावा, असे आवाहन त्यांनी केले. संकटकाळात शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासह जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यावरही त्यांनी भर दिला.

टंचाईच्या काळात मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कामे आणि निधी सरकारकडून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पंचायतराज अभियानासाठी संसाधनांची कमतरता भासू देणार नाही

गावांचा विकास, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री पंचायतराज अभियान’ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी निधी किंवा संसाधनांची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आडाचीवाडी ग्रामपंचायतीला मिळालेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार हा गावाच्या विकासकामांची आणि सामूहिक प्रयत्नांची दखल मानला जात आहे. या पुरस्कारामुळे इतर ग्रामपंचायतींनाही विकासकामांसाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button