TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

MPSC आंदोलनाचा उद्या निर्णायक टप्पा? रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

आंदोलनाचा अकरावा दिवस; ‘आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांशी चर्चा करून ठोस निर्णय घ्या’; आयोगाच्या शुद्धीकरणासाठी अध्यक्षांना हटवण्याच्या मागणीवर रोहित पवार ठाम

पुणे : पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांशी चर्चा करून ठोस निर्णय घ्यावा; अन्यथा उद्या विद्यार्थी वेगळा निर्णय घेऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्यासोबतच सरकारलाही जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे ते म्हणाले.

माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी MPSC अध्यक्ष भीमनवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांपेक्षा मित्राची काळजी अधिक घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अध्यक्षांना हटवण्याच्या मागणीवर सरकारने दोन-तीन दिवसांत निर्णय घ्यायला हवा होता; मात्र हा विषय लांबवला जात असल्याचे पवार म्हणाले.

‘आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या’

“आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांना भेटा, त्यांच्याशी बोला आणि ठोस निर्णय घ्या. अन्यथा उद्या विद्यार्थी वेगळा विचार करू शकतात,” असे रोहित पवार यांनी सांगितले. आंदोलनाचे पुढील स्वरूप काय असेल, याबाबत संध्याकाळी भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

MPSC आयोगाचे शुद्धीकरण झालेच पाहिजे आणि त्यासाठी अध्यक्षांना पदावरून हटवणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी पुन्हा केली. विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळी ‘अर्बन नक्षल’ म्हणणे आणि त्यांनी पैसे घेतल्याचे आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत, विद्यार्थी स्वतःच्या हक्कांसाठी लढत असल्याचे पवार म्हणाले.

सामान्य आणि गरीब कुटुंबांतील, तसेच शेतकऱ्यांची मुले आपल्या भविष्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरली आहेत. त्यांच्या आंदोलनाची थट्टा करणे योग्य नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा –   CJP आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचे कडक निर्देश; दिल्ली पोलिसांना अवमानाची नोटीस

‘मुख्यमंत्री मित्राचा विचार करत आहेत’

MPSC अध्यक्ष भीमनवार यांची नियुक्ती आणि त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा उल्लेख करत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. भीमनवार आणि मुख्यमंत्री यांचे जुने संबंध असल्याचा दावा करत, अध्यक्षांना हटवण्याच्या मागणीवर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा मित्राचा विचार केला जात असल्याचे चित्र निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षांबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची असून, विद्यार्थ्यांची मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारावा लागेल, अशी भूमिका पवार यांनी मांडली.

सरकारच्या खर्चावरही टीका

राज्य सरकारने शेतकरी आणि विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांसाठी ठोस मदत जाहीर झालेली नसताना कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचे नियोजन केले जात असल्याची टीका त्यांनी केली.

महागड्या लँड क्रूझर गाड्यांच्या खरेदीचा कथित प्रस्ताव आणि लंडनमधील खासगी कंपनीच्या कार्यक्रमासाठी सरकारी खर्चातून अधिकारी पाठवणे, तसेच आयोजनासाठी पाच कोटी रुपये दिल्याचा दावा त्यांनी केला. सार्वजनिक निधीच्या वापराबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

MPSC आंदोलनाचा अकरावा दिवस सुरू असताना आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्याची मागणी आणि सरकारच्या भूमिकेवरून राजकीय वातावरण तापले आहे. आज संध्याकाळपर्यंत सरकार काय निर्णय घेते आणि आंदोलनकर्ते पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button