TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी वाहतूक कोंडीचा मुद्दा; रोहित पवार आक्रमक, पोलिसांना १५ मिनिटांचा अल्टिमेटम

‘अलका टॉकीज चौकात जाऊन बसू’; वाहनांमुळे विद्यार्थ्यांना धोका असल्याचा दावा, रोहित पवारांच्या भूमिकेनंतर एस. एम. जोशी पुलावरील वाहतूक बंद

पुणे : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी वाहतूक व्यवस्थेवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी वाहनांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी पोलिसांशी संवाद साधत आक्रमक भूमिका घेतली. पुढील १० ते १५ मिनिटांत वाहतुकीबाबत योग्य निर्णय न घेतल्यास अलका टॉकीज चौकात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

आंदोलनाच्या दिशेने वाहने वळवली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मागील काही दिवसांपासून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक वळवण्यात आली होती. मात्र, कालपासून पुन्हा आंदोलनस्थळाच्या दिशेने वाहने पाठवली जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.

रोहित पवार यांनी पोलिसांना उद्देशून सांगितले की, विद्यार्थ्यांच्या दिशेने वाहतूक वळवल्याने त्यांना त्रास होत आहे. वाहन एखाद्या विद्यार्थ्याच्या पायावर गेल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा –  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने बंद; १५ किंवा १६ ऑक्टोबरपासून भाविकांना दर्शन बंद राहण्याची शक्यता

‘अलका चौकात जाऊन बसू’

वाहतूक व्यवस्थेबाबत पोलिसांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करत रोहित पवार यांनी १० ते १५ मिनिटांची मुदत दिली. निर्णय न झाल्यास विद्यार्थ्यांसह अलका टॉकीज चौकात जाऊन बसण्याची भूमिका त्यांनी मांडली.

‘आम्ही अलका चौकात जाऊन बसलो तर उठणार नाही,’ अशी भूमिका रोहित पवार यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांना नोटिसा दिल्या म्हणून ते आंदोलनापासून मागे हटणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

रोहित पवारांच्या भूमिकेनंतर आंदोलनस्थळी विद्यार्थीही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर एस. एम. जोशी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

MPSC विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन आणि उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला रोहित पवार यांच्यासह विविध राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते भेट देत असून, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

दरम्यान, हे आंदोलन पुण्याहून मुंबईच्या दिशेने हलवण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांनीही या पर्यायाला संमती दर्शवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या या परिस्थितीनंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे आता लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group