TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही’; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, लाभार्थी महिलांना दिलासा

योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम; २,१०० रुपयांच्या आश्वासनाची अद्याप प्रतीक्षा, सध्या खात्यात ₹१,५०० जमा

परभणी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सुरू असलेल्या चर्चांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘कोणीही आलं तरी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही,’ अशी घोषणा शिंदे यांनी परभणी येथे बोलताना केली. त्यामुळे या योजनेच्या भवितव्याबाबत चिंतेत असलेल्या लाभार्थी महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा केले जातात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांसाठी ही योजना लागू करण्यात आली होती.

KYC नंतर लाखो नावे वगळली

योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी सरकारने KYC प्रक्रिया बंधनकारक केली. KYC न करणाऱ्या तसेच निकषांमध्ये अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळण्यात आली. काही ठिकाणी पात्रतेच्या अटींचे उल्लंघन करून लाभ घेतल्याचेही समोर आले होते.

KYC प्रक्रियेनंतर लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याने या योजनेबाबत राजकीय चर्चेला उधाण आले. विरोधकांकडून योजना बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, आता एकनाथ शिंदे यांनी योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा –  ‘एकदा बाहेर ते कायमचे बाहेर’; सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना सूचक इशारा

‘२,१०० रुपयां’च्या आश्वासनाचे काय?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी सत्तेत परतल्यास लाडक्या बहिणींना दरमहा २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपयेच जमा होत आहेत.

त्यामुळे २,१०० रुपयांच्या वाढीव हप्त्याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, योजना बंद होणार नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केल्याने योजनेच्या सातत्याबाबत सरकारची भूमिका समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना नियमित आर्थिक मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, पात्र लाभार्थ्यांना यापुढेही योजनेचा लाभ मिळत राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button