TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शरद पवारांचा फडणवीसांना फोन; ‘विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्ग काढा’

पुण्यातील आंदोलनाची घेतली दखल; ‘विद्यार्थ्यांना न्याय देणे सरकारची नैतिक जबाबदारी’ अशी शरद पवारांची भूमिका

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. २ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी यांच्यात थेट संवाद होणे आवश्यक आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. प्रश्न सोडवण्यासाठी सुसंवादाची गरज असून, चर्चा झाली तरच तोडगा निघू शकतो, असे त्यांनी सांगितले.

‘विद्यार्थ्यांशी संवाद साधावा’

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करावा. विद्यार्थ्यांना न्याय देण्याची सरकारची नैतिक जबाबदारी आहे,” असे शरद पवार यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी आपल्याकडे आले होते. त्यांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा व्हावी, असे पवार यांनी म्हटले. कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी संवाद महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  नारायणगडच्या दसरा मेळाव्यासाठी मराठा समाजाने मोठ्या संख्येने यावे; मनोज जरांगे पाटलांचे आवाहन

‘मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोललो’

विद्यार्थ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस नागपूरमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.

“मुख्यमंत्री मुंबईत आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी,” अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केल्याचे पवार यांनी सांगितले.

MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून यापूर्वीही निर्णय

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेतली होती. MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या कार्यपद्धतीची तीन महिन्यांत चौकशी करण्याचे तसेच आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आश्वासन देण्यात आले होते. आगामी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यासह भरती प्रक्रियेबाबतही सरकारकडून काही निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.

मात्र, अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पुण्यातील आंदोलन सुरूच आहे. सध्या आंदोलनाच्या ठिकाणी विविध गटांकडून वेगवेगळ्या मागण्या मांडल्या जात असल्याचेही वृत्त आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button