दोन विषारी इंजेक्शन्स देऊनही महिला कैदी जिवंत; अमेरिकेत मृत्युदंडाची प्रक्रिया अयशस्वी!

Christa Pike death penalty | अमेरिकेतील टेनेसी राज्यात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या क्रिस्टा पाइक या महिला कैद्याच्या फाशीच्या अंमलबजावणीदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्मिळ घटना घडली आहे. नॅशव्हिलमधील ‘रिव्हरबेंड मॅक्सिमम सिक्युरिटी इन्स्टिट्यूशन’मध्ये पाइकला प्राणघातक ‘पेंटोबार्बिटॉल’ या विषाचे एकापाठोपाठ दोन डोस देण्यात आले; मात्र तरीही तिचे हृदय धडधडत असल्याचे समोर आले. यानंतर मृत्युदंडाची प्रक्रिया तातडीने थांबवून तिला कारागृहाबाहेरील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ‘बीबीसी न्यूज’ने यासंदर्भातील सविस्तर वृत्त दिले आहे.
३० सप्टेंबरच्या रात्री नियोजित प्रक्रियेनुसार पाइकला मृत्युदंड देण्यासाठी घातक रसायनांचे दोन डोस देण्यात आले. मात्र, पाइक बेशुद्ध पडली असली तरी तिचे हृदय बंद पडले नाही आणि तिच्या हृदयाचे ठोके सुरूच राहिले. मृत्युदंडाची प्रक्रिया अयशस्वी झाल्याचे लक्षात येताच तिच्या वकिलांनी न्यायालयात तातडीने आपत्कालीन अर्ज दाखल करून प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली. त्यानंतर तिला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेनेसी डिपार्टमेंट ऑफ करेक्शनने पाइकला रुग्णालयात हलवल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा
१९९५ मधील हत्येप्रकरणी झाली होती शिक्षा
क्रिस्टा पाइकला १९९५ मध्ये १९ वर्षीय सहकारी कॉलिन स्लॅमर हिच्या निर्घृण हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. गुन्हा घडला तेव्हा पाइक अवघ्या १८ वर्षांची होती. १९९६ मध्ये तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तब्बल तीन दशकांनंतर तिच्या या शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली होती. तिच्या बचाव पक्षाने बालपणी झालेले लैंगिक शोषण आणि मानसिक आरोग्याचा मुद्दा उपस्थित करत शेवटपर्यंत कायदेशीर लढा दिला; मात्र सर्वोच्च न्यायालय आणि टेनेसीचे राज्यपाल बिल ली यांनी दया याचिका फेटाळली होती.
राज्यपालांकडून स्वतंत्र चौकशीचे आदेश
मृत्युदंडाचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर टेनेसीचे राज्यपाल बिल ली यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या वर्षातील इतर सर्व नियोजित मृत्युदंडाच्या शिक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, कारागृह प्रशासनाने आपण राज्याच्या मंजूर प्रोटोकॉलनुसारच प्रक्रिया राबवली असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेत १९७६ नंतर केवळ १८ महिलांना मृत्युदंड देण्यात आला असून, या दुर्मिळ घटनेनंतर पाइकच्या पुढील कायदेशीर स्थितीबाबत मोठी कायदेशीर चर्चा सुरू झाली आहे.





