TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिवेआगर समुद्रकिनारी काळीज पिळवटून टाकणारी घटना; आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

सहलीसाठी गेलेल्या विनर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना, सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश

रायगड : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (१ ऑक्टोबर) अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेत होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात ओढले गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा समूह सहलीसाठी दिवेआगर येथे आला होता. दुपारच्या सुमारास काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. त्यावेळी अचानक काही विद्यार्थी खोल पाण्यात गेले. घटना लक्षात येताच स्थानिक नागरिक, वॉटर स्पोर्ट्स कर्मचाऱ्यांसह पोलिस आणि बचाव पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र आठ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले नाही. सर्व आठ मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहेत.

या दुर्घटनेत राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासनकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे आणि प्रणव बनसोडे या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बोर्ली पंचतन येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा –  सेवा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी डॉ. सुहास कांबळे यांचा पुढाकार; नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल

प्रशासनाकडून मदतकार्य

दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. दुर्घटनेतील बचावलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधल्याचे सांगितले. बाहेरून सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना समुद्रातील पाण्याचा अंदाज नसल्याने अशा दुर्घटना घडू शकतात, असे त्यांनी नमूद केले. स्थानिक रेस्क्यू टीमकडून समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन केले जाते, मात्र घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.

या दुर्घटनेमुळे आळंदी तसेच पुणे परिसरात शोककळा पसरली असून, सहलीसाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button