सेवा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी डॉ. सुहास कांबळे यांचा पुढाकार; नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल
राजा शिवछत्रपती चौक ते केंद्रीय विहार चौकापर्यंतच्या रस्त्याची पाहणी; मनपा अभियंत्यांना तातडीच्या कार्यवाहीचे निवेदन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक ८ मधील पुणे-नाशिक महामार्गालगत राजा शिवछत्रपती चौक ते केंद्रीय विहार चौकापर्यंतच्या सेवा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांकडून करण्यात आलेल्या मागणीची नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी नुकतीच संबंधित सेवा रस्त्याची समक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

या सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, स्ट्रॉम वॉटर लाइन, ड्रेनेज लाइन तसेच महावितरण केबलसाठी करण्यात आलेले खोदकाम व्यवस्थित बुजविण्यात आलेले नाही. काही ठिकाणी चेंबरची झाकणे रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच झाली आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहनचालक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा – ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही’; अभिजीत दिपकेंच्या आंदोलनावर नितेश राणेंचा सवाल

नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर डॉ. सुहास कांबळे यांनी महापालिका अभियंत्यांना निवेदन देत रस्त्यावरील खड्डे बुजविणे, खोदलेले चर व्यवस्थित बुजविणे, चेंबरची झाकणे रस्त्याच्या पातळीवर आणणे आणि आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची मागणी केली.

यावेळी उपस्थित नागरिकांनी परिसरातील इतर आवश्यक कामांकडेही डॉ. कांबळे यांचे लक्ष वेधले. नागरिकांनी सुचविलेली कामे मार्गी लावण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन उपस्थितांना देण्यात आले.
नागरिकांच्या तक्रारीवर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आल्याने या सेवा रस्त्याच्या प्रश्नाला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“नागरिकांची सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि वाहनचालक या सेवा रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था, खड्डे आणि पावसाळ्यात होणारे पाणी साचणे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नागरिकांनी निदर्शनास आणून दिलेल्या समस्या प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. रस्त्याची आवश्यक ती दुरुस्ती आणि डांबरीकरणाची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. नागरिकांना सुरक्षित आणि सुकर वाहतूक सुविधा मिळणे ही आपली प्राथमिकता आहे.”
– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक पिंपरी-चिंचवड महानगरपालिका





